पालघर जिल्ह्यात पावसाळ्यानंतरच्या पूर्वार्धात बालमृत्यूच्या प्रमाणात घट- आरोग्यमंत्री

आरोग्यमंत्र्यांनी डहाणूतील काही भागांत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र व पाड्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी कुपोषित आणि तीव्र कुपोषित बालकांची घरी जाऊन भेट घेत त्यांची विचारपूस केली.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पालघर जिल्ह्यात पावसाळ्यानंतरच्या पूर्वार्धात कुपोषणामुळे होणारे बालमृत्यूचं प्रमाण घटलंय. गेल्या तीन वर्षांतील एप्रिल ते जुलै या चार महिन्याच्या बालमृत्यूची आकडेवारी पाहता यावर्षी बालमृत्यू रोखण्यात यश येत असल्याचं आढळून आलंय, मात्र तरीही अजूनही पूर्णपणे समाधानी नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितलं. आरोग्यमंत्र्यांनी शुक्रवारी डहाणू, तलासरी या भागाचा दौरा केला.

आरोग्यमंत्र्यांनी यावेळी डहाणू तलासरी या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र व पाड्यांना भेट दिली. त्यासोबतचं प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सरावली उपकेंद्र, पाटीलपाडा, पारसपाडा, चरी उपकेंद्र, वडवली उपकेंद्र, डोंगरीपाडा, जिल्हात पाडा येथील कुपोषित आणि तीव्र कुपोषित बालकांची घरी जाऊन भेट घेत त्यांची विचारपूस केली. तसंच बाल उपचार केंद्रातून घरी सोडण्यात आलेल्या बालकांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं. शिवाय उपचार केंद्रातून बालक घरी आल्यावर त्याची निगा कशी राखावी याबाबत अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्तीने मार्गदर्शन करावं, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

याविषयी आरोग्यमंत्री डॉ. सावंत सांगतात की, “गेल्यावर्षी या काळात ९३ बालमृत्यू झाले होते तर यावर्षी ३८ बालमृत्यू झालेत. मात्र यापैकी ८ मृत्यू हे अपघाती आहेत. आरोग्य यंत्रणेकडून बालमृत्यू रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना यश येताना दिसतंय.”

वाडा ग्रामीण रूग्णालय, जव्हार व मोखाडा तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकुण ९ ठिकाणी आरोग्य संस्थामध्ये बाल उपचार केंद्र सुविधा उपलब्ध आहे. डहाणू, वाडा, विक्रमगड तालुक्यातील १० प्राथमिक आरोग्य केद्रावर बाल उपचार केंद्र सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे तसेच जव्हार व मोखाडा तालुक्यातील ०-६ महिने वयोगटातील सर्व बालकांना एक दिवसाआड तसंच ७ महिने ते १ वर्ष या वयातील बालकांची दर १५ दिवसांनी आशा सेविकांमार्फत भेट देऊन त्यांच्या आरोग्याबाबतच्या परिस्थितीची नोंदही ठेवण्यात येते.

राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत सर्व मुलांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते. आदिवासी तालुक्यांमध्ये मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत आदिवासी तालुक्यांमध्ये गरोदर माता, स्तनदा माता व ० ते ६ महिने वयोगटातील मुलं तसंच सॅम व मॅम श्रेणीतील मुलांची प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामिण रूग्णालय स्तरावर शिबिरं आयोजित करून तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येते. आरोग्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या विविध उपक्रमांमुळे पालघर मधील बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यात यश मिळतंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter