पोद्दार आयुर्वेद रुग्णालयातील डॉक्टरांचा आमरण उपोषणचा इशारा

मुंबईतील पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रशासनाने इंटर्न डॉक्टरांना हॉस्टेल रिकामं करण्याचे आदेश जारी केले. ज्यानंतर डॉक्टरांनी संपाचं हत्यार उगारलं. डॉक्टरांचा संप गेले १० दिवस सुरू आहे. राज्य सरकारकडे बैठका झाल्या मात्र तोडगा निघत नसल्याने डॉक्टरांनी आता सरकारला आमरण उपोषणाचा इशारा दिलाय.

0
2527
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

इंटर्नशिप करणार्‍या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वसतीगृहात राहता येणार नाही, असा फतवा पोद्दार रुग्णालय प्रशासनाने काढला. या निर्णयाला विरोध दर्शवत प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी संप पुकारला. बुधवारी डॉक्टरांच्या संपाचा दहावा दिवस, मात्र अजूनही तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारने डॉक्टरांच्या मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं. पण, सरकार मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, असा आरोप करत डॉक्टरांनी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय.

विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या संपाची आयुर्वेद संचालनालयाने दखल घेत यासंदर्भात बैठकही घेतली. या शिवाय वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ गोविंद खटी आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली होती. गिरीश महाजन यांनी विद्यार्थ्याची बाजू विचारात घेऊन त्यावर वैद्यकीय शिक्षण सचिवाशी चर्चा करून निर्णय दिला जाईल असं आश्वासन दिलं होतं.

aefd5067-19f8-4f7b-a613-6b0aeea3d5d4

तर, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी पोद्दार महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते. मात्र, ही भेट सुद्धा रद्द झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

डॉक्टरांच्या या संपाबाबत आयुर्वेदिक महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. गोविंद खटी यांना विचारले असता ते म्हणाले की, ”विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात आता वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण सर्व बाबींची चौकशी करून योग्य तो निर्णय देतील. याबाबत मी काहीच करणार नाही. त्यामुळे या संपाप्रकरणी मंत्री जो निर्णय देतील, तो आम्हाला मान्य असेल”.

या महाविद्यालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले विद्यार्थी आहेत. त्यांना वसतिगृहामध्ये राहता येणार नाही, अशा सूचना दिल्यामुळे त्यांना आता जायच कुठे अशी चिंता लागून राहिली आहे. वसतिगृहामध्ये राहता येणार नाही, याची कल्पना वर्षाच्या सुरुवातीलाच का देण्यात आली नाही, असा प्रश्नही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter