मुंबई: गर्भनिरोधनासाठी ‘अंतरा’ला पसंती

गर्भनिरोधकाचा वापर वाढावा आणि दांपत्याचे आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी अंतरा हे इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात आलं. पालिकेची सर्व रुग्णालये, उपनगरी रुग्णालये, प्रसूतिगृहे, वैद्यकीय महाविद्यालये, चिकित्सालये यामध्ये सरकारने हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले आहे.

0
420
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीच महिलांसाठी सर्व सरकारी व पालिका रुग्णालयांत अंतर नावाचे ‘इंजेक्टेबल गर्भनिरोधक इंजेक्शन’ (डीएमपीए) मोफत उपलब्ध करून दिले. या उपक्रमाला महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

जुलै ते ऑक्टोबर २०१७ या अवघ्या चार महिन्यात मुंबईतल्या पालिका व सरकारी रुग्णालयांत १,९८६ महिलांनी हे इंजेक्शन घेतले आहे.

‘अंतरा’ हे इंजेक्शन याआधी खासगी रुग्णालयांत उपलब्ध होते. परंतु, खासगी रुग्णालयात या इंजेक्शनचा खर्च जास्त असल्याने सर्वसामान्य महिला याचा लाभ घेऊ शकत नव्हत्या. या कारणास्तव राज्य सरकारने, ‘अंतरा’ नावाचे ‘इंजेक्टेबल गर्भनिरोधक’ (डीएमपीए) महिलांसाठी पालिका व सरकारी रूग्णालयात उपलब्ध करून दिले.

गर्भनिरोधकाचा वापर वाढावा आणि दांपत्याच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुटुंब नियोजनासाठी कुटुंब कल्याण विभागाने हे इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला. पालिकेची सर्व रुग्णालये, उपनगरी रुग्णालये, प्रसूतिगृहे, वैद्यकीय महाविद्यालये, चिकित्सालये यामध्ये हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले आहे.

पालिकेच्या कुटुंब कल्याण नियोजनाच्या प्रमुख अधिकारी डॉ. आशा अडवानी म्हणाल्या की, “सद्य स्थितीत कुटुंब नियोजनासाठी कायम स्वरूपाच्या पद्धतीमध्ये पुरुष नसबंदी,स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया हे पर्याय उपलब्ध आहेत. तर तात्पुरत्या स्वरूपाच्या पद्धतीमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केले जाते. पण आता फक्त गर्भनिरोधक इंजेक्शनचा वापर करण्याची नवी पद्धत आत्मसात होऊ लागली आहे. हे इंजेक्शन महिलांना तीन महिन्यांतून एकदाच घ्यावे लागते.”

डॉ. आशा अडवाणी पुढे म्हणाल्या की,”गर्भधारणा टाळण्यासाठी महिलांना आता हे इंजेक्शन अतिशय सुरक्षित वाटू लागले आहे. यामुळे महिला स्वतःहून पुढे येत गर्भनिरोधक इंजेक्शन टोचून घेत आहेत. जुलै २०१७ पासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत  मुंबईत १,९०३ महिलांनी इंजेक्शन घेतले होते. तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच ऑक्टोबर ते आतापर्यंत ८३ महिलांनी हे इंजेक्शन पालिका रुग्णालयातून घेतल्याची नोंद करण्यात आली आहे.”

याबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना शीव रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राहुल मयेकर म्हणाले की, “गर्भधारणा टाळण्यासाठी महिलांना रोज आठवणीने गोळ्या घ्याव्या लागतात. पण हे इंजेक्शन दर तीन महिन्यांनी एकदाच घ्यावे लागते. गोळ्यांमुळे हार्मोनल असंतुलन होते. तो धोका या इंजेक्शनमध्ये नसोत. स्तनदा मातांमध्ये गोळ्यांचा पर्याय टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र हे इंजेक्शन स्तनदा माताही घेऊ शकतात. इतकंच नाहीतर महिलेची प्रसूती झाल्यानंतर डॉक्टर कुटुंबियांची परवानगी घेऊन लगेचच महिलेला हे इंजेक्शन टोचतात.”

वापर कसा कराल-

  • ‘अंतरा’ या इंजेक्शनचा वापर मासिक पाळी सुरू झाल्यानंतर अथवा गर्भपातानंतर सात दिवसांच्या आता करता येतो.
  • प्रसूतीनंतर सहा आठवड्यांनी हे इंजेक्शन घेऊन पुढील प्रसूती टाळता येते.
  • स्नायूंमध्ये देण्यात येणाऱ्या या इंजेक्शनचा प्रभाव तीन महिन्यांपर्यंत राहतो.
  • दर तीन महिन्यांनी महिलांना कुठल्याही पालिका व सरकारी रुग्णालयात जाऊन हे इंजेक्शन घ्यावे लागते.
  • मुंबईसह पुणे,रायगड, नंदुरबार, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली,रत्नागिरी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली आहे.

अंतराइंजेक्शनची प्रमुख वैशिष्ट्ये

  • प्रसूतीनंतर व गर्भपातानंतर १८ ते ४५ वयोगटातील महिला हे इंजेक्शन घेऊ शकतात
  • दर तीन महिन्यांनी हे इंजेक्शन घ्यावे
  • स्तनपानावर या इंजेक्शनचा कुठलाही दृष्परिणाम होत नाही
  • हे दिर्घकालीन व अत्यंत प्रभावी गर्भनिरोधक आहे.
  • अंतरा इंजेक्शन बंद केल्यास पुन्हा गर्भधारणा होऊ शकते.
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter