धक्कादायक… महिलांच्या आत्महत्या ११ टक्क्यांनी वाढल्या

१९९० ते २०१६ या २६ वर्षात महिलांच्या आत्महत्येचं प्रमाण २५.३ टक्क्यांवरून ३६.६ टक्क्यांवर पोहोचलं, अशी धक्कादायक माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत दिली.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

ठाण्यात परीक्षेच्या तणावातून एमबीबीएस विद्यार्थीनीची आत्महत्या… नवी मुंबईत आईने मोबाईल न दिल्यानं १४ वर्षाच्या मुलीची आत्महत्या… नवीन वर्ष सुरू होऊन आठवडा होत नाही, तोच अशा आत्महत्येच्या घटना कानावर पडत आहेत… तर भारतात महिलांच्या आत्महत्येचा आकडा झपाट्यानं वाढत असल्याची धक्कादायक कबुली केंद्र सरकारनं दिली आहे.

भारतातील वाढत्या आत्महत्यांबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी १९९० ते २०१६ या २६ वर्षात महिलांच्या आत्महत्येचं प्रमाण ११ टक्क्यांनी वाढल्याचं सांगितलं.

अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार,

१९९० – महिलांच्या आत्महत्येचं प्रमाण २५.३ टक्के

२०१६ – महिलांच्या आत्महत्येचं प्रमाण ३६.६ टक्के

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी सांगितलं, “आत्महत्येचं मूळ हे त्या व्यक्तीचं सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, मानसिक आणि आरोग्याची स्थितीशी आहे. या आधी आत्महत्येचा प्रयत्न, मानसिक आजार, कामात नुकसान, आर्थिक तोटा, नैराश्य, गंभीर आजार या गोष्टी कारणीभूत आहेत, तसंच कुटुंबातील एखाद्या सदस्याची आत्महत्या आणि आनुवंशिक घटक या गोष्टींमुळेही आत्महत्या होत आहेत. आत्महत्या रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.”

अॅडवान्स मल्टी हॉस्पिटलचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे म्हणाले की, “महिलांच्या आत्महत्येच्या प्रमाणात 11 टक्क्यांनी वाढ होणं हे फार गंभीर आहे. आताची जर महिलांची परिस्थिती पाहिली तर पूर्वीप्रमाणे महिलांना कुटुंबाकडून पाठिंबा मिळत नाही. तसंच आजच्या घडीला महिला सक्षम झाल्या आहेत मात्र तरीही त्याचा फायदा होताना दिसत नाही. कारण महिलांना अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात आणि अशाच कारणांमुळे हा दर वाढला असल्याची शक्यता आहे.”

मुंबईतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आदिती आचार्य यांच्या सांगण्यानुसार, “महिलांच्या आत्महत्येचा दर वाढण्यामागे एक कारण असू शकतं ते म्हणजे आताप्रमाणे पूर्वी आत्महत्या झाल्याची नोंद व्हायची नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या महिलांमध्ये वाढणाऱ्या जबाबदाऱ्या आणि त्यामुळे वाढणारा ताण. तर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बदललेल्या जीवनशैलीमुळे महिलांना मिळाला पाठिंबा कुठेतरी कमी होताना दिसतोय.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter