महिलांचं आरोग्य सुनिश्चित करेल देशाची प्रगती- पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी नवी दिल्लीत 'PMNCH Partners’ Forum ला संबोधित केलं. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील तज्ज्ञांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताने आरोग्य क्षेत्रात काय उल्लेखनीय कामगिरी केली याची माहिती दिली. देशाची प्रगती महिलांच्या आरोग्यावर अवलंबून असते असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हंटलं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • देशाची प्रगती महिलांच्या आरोग्यावर अवलंबून आहे
  • महिलांचं आरोग्य सुदृढ राहिलं तर देशाची प्रगती मोठ्या वेगाने होण्यास मदत होते
  • महिला आणि लहान मुलं स्वावलंबी बनली, त्यांना योग्य प्रकारे शिक्षण मिळालं, आरोग्याचे प्रश्न सुटले तर देशाची निश्चितच प्रगतीकडे वाटचाल होते
  • ‘PMNCH Partners’ Forum च्या दिल्लीतील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

नवी दिल्लीत होणाऱ्या या दोन दिवसांच्या कार्यक्रमाला जागतिक पातळीवर आरोग्य क्षेत्रात काम करणारे नेते, आणि डॉक्टर उपस्थित आहेत. कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “देशातील माता, मुलांचं भविष्य ठरवतात आणि मुलांच्या भविष्यावर देशाचं भविष्य अवलंबून आहे. आपण सर्वजण या ठिकाणी जगभरातील माता आणि लहान मुलांच्या आरोग्याबाबत चर्चा करण्यासाठी जमलो आहोत. आपल्या चर्चेचा मोठा परिणाम येत्या काही वर्षात पहायला मिळणार आहे.”

पंतप्रधान पुढे म्हणाले, “भारतात माता आणि नवजात बालकांचा मृत्यूदर फार जास्त होता. पण, गेल्या काही वर्षात सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे हा मृत्यूदर कमी झालाय.”

गेल्या तीन वर्षात भारतातील 8.4 दशलक्ष गर्भवती महिला आणि 32.8 दशलक्ष लहान मुलांचं लसीकरण करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी उपस्थितांना दिली.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “नवजात बालकांसाठी सरकारने खास कक्ष स्थापन केलेत. यामुळे दरदिवशी 840 बालकांचे प्राण वाचवणं शक्य होतंय. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत 800 दशलक्ष मुलांची आरोग्य तपासणी झाली आहे. 2025 पर्यंत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा 2.5 टक्के भाग हा आरोग्य सेवेसाठी खर्च करण्याबाबत भारत सरकार कटीबद्ध आहे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter