रुग्णालयाबाहेर नववधूंच्या रांगा

लग्नाच्या दिवशी चेहरा रेखीव करण्यासाठी नववधू फक्त मेकअप नव्हे तर कॉस्मेटिक ट्रिटमेंटदेखील करून घेत आहेत.

0
1723
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

लग्न म्हटलं की लग्नाच्या दिवशी सुंदर दिसण्यासाठी महिनाभर आधीपासूनच नववधूची तयारी सुरू होते. कसा मेकअप हवा, कोणती हेअरस्टाईल हवी. मात्र आता लग्नाच्या दिवशी सुंदर दिसणं हे फक्त ब्युटीपार्लरपुरता मर्यादित राहिलं नाही, तर रुग्णालयाबाहेरही नववधूंच्या रांगा लागल्यात.

कुणाला जॉलाईन परफेक्ट हवी आहे, कुणाला ओठ मोठे करून हवेत, कुणाला नाक टोकदार हवं आहे आणि हे सर्व मेकअपने नव्हे तर प्रत्यक्षात करून हवं आहे. यासाठी नववधूंची पावलं ब्युटी पार्लरप्रमाणे आता रुग्णालाच्या दिशेनं वळू लागलीत. चेहरा रेखीव करण्यासाठी फक्त मेकअप नव्हे तर कॉस्मेटिक ट्रिटमेंट घेतल्या जात आहेत.

पुण्यातील त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. शिखा नायर यांनी सांगितलं, “आपल्या लग्नाच्या दिवशी सुंदर दिसण्यासाठी अनेक नववधू असे उपचार घेत आहे. काही जणी पती किंवा नातेवाईकांनी आग्रहास्तव असे उपचार घेतात किंवा काही वेळा नववधूला सुंदर दिसायचं असतं. यामध्ये डार्क सर्कल, फुलर लिप्स, परफेक्ट जॉलाईन यावरील उपचारासाठी सर्वाधिक विचारणा होते. अशी प्रकरणं लग्नाच्या सिझनमध्ये वाढल्याचं आम्ही पाहिलं आहे”

हे उपचार खूपच महाग आहे. त्याचा परिणाम फक्त एका दिवसापुरता असतो. कॉस्मेटिक सर्जन आणि त्वचाविकार तज्ज्ञ यांनी सांगितलं की, काही रुग्णालयांनी प्री-ब्रायडेल कॉस्मेटिक ट्रिटमेंटसाठी पॅकेजेसदेखील सुरू केलेत.

मुंबईतील प्लॅस्टिक सर्जन डॉ. उज्ज्वला दहिफळे यांनी सांगितलं, “लग्नाच्या सिझनमध्ये ही प्रकरणं वाढत आहेत. आपल्या लग्नाच्या दिवशी आपण सुंदर दिसावं यासाठी अनेक मुली असे महागडे उपचार घेण्यासाठी तयार असतात. नववधू त्यांना असलेल्या समस्या घेऊन आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यानुसार त्यांना उपचार देतो. हा सध्या नवीन ट्रेंड आहे आणि तो खूप वाढतो आहे”

पुण्यातील २७ वर्षांची नेहा दुबे गेल्या महिन्यात त्वचाविकार तज्ज्ञांकडे गेली. तिला आपल्या ओठांच्या रचनेत बदल करायचा होता. नेहा म्हणाल्या, आपण एकदाच लग्न करतो. लग्नसोहळ्याचे फोटोमार्फत टिपलेले क्षण आपल्यासोबत आयुष्यभर असतात. मला माझ्या लग्नाच्या दिवशी एकदम परफेक्ट दिसायचं होतं, त्यामुळे मी उपचाराचा पर्याय निवडला.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter