जाणून घ्या डॉक्टरांना ‘नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक’ का मान्य नाही

मोदी सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातील काही मुद्द्यांवर डॉक्टरांना आक्षेप आहे. अशा परिस्थितीत हे विधेयक मान्य करणार नाही असं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. मंगळवारी सकाळपासून डॉक्टरांनी १२ तासांचा संप पुकारलाय. मंगळवारी आयएमएच्या देशभरातील कार्यालयात डॉक्टर बैठका घेणार आहेत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाच्या मुद्द्यावरून डॉक्टर आणि मोदी सरकारमध्ये ‘आर-या-पार’ची लढाई सुरू झालीये. सरकारचं विधेयक डॉक्टरांना मान्य नाही. डॉक्टरांनी मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून संपाला सुरूवात केलीये. देशभरातील लाखो डॉक्टर संपावर गेलेत. हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून डॉक्टर पाळणार आहेत.

सरकारने मागण्या मान्य केल्या तर ठीक, नाहीतर सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल असं वक्तव्य इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी डॉक्टरांच्या बैठकीत केलं होतं. एमबीबीएसचे वैद्यकीय विद्यार्थीही या आंदोलनात सहभागी झालेत.

डॉक्टरांना नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाच्या मसुद्यातील काही तरतुदींवर आक्षेप आहे.

डॉक्टरांचे आक्षेप,

 • नव्या विधेयकामुळे भ्रष्टाचार वाढेल
 • वैद्यकीय कॉलेज सुरु करण्यासाठी लागणाऱ्या अटी नाहीत
 • वैद्यकीय कॉलेज काढण्यासाठी परवानगीची गरज नाही
 • कॉलेजांना वैद्यकीय जागा वाढवण्याची परवानगी
 • फक्त ४० टक्के जागांवर सरकारी अंकुश
 • बाकी ६० टक्के जागांची फी कॉलेज ठरवणार
 • असं झालं तर तळागाळातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मिळणार नाही
 • ५ कोटीपासून ते १०० कोटींपर्यंत दंड, यामुळे भ्रष्टाचार बोकाळेल
 • देशात वैद्यकीय शिक्षण महाग होईल
 • फक्त पाच राज्याचे प्रतिनिधी, बाकी २४ राज्यांवर अन्याय
 • राज्यातील मेडिकल काउंसिल यांची स्वायत्तता घोक्यात
 • मेडिकल काउंसिल नॅशनल मेडिकल कमिशनच्या अंतर्गत येणार
 • वैद्यकीय विद्यापिठांना आपलं मत नोंदवण्याचा अधिकार नाही
 • लोकांच्या विरोधात, श्रीमंताच्या बाजूचं
 • यामुळे वैद्यकीय उपचारांची किंमत वाढेल
 • आयुर्वेद डॉक्टरांना अलोपॅथीच्या प्रॅक्टिससाठी ब्रीज कोर्स

मोदी सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातील या प्रमुख तरतुदींवर देशभरातील डॉक्टरांना आक्षेप आहे. त्यामुळे मोदी सरकारविरोधात आता डॉक्टर करो-या-मरोची लढाई लढतायत. सहा आठवड्यात सरकारने मागणी मान्य केली नाही तर संप पुकारण्याचा डॉक्टरांचा निर्णय जवळपास नक्की झालाय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter