‘या’ सोप्या उपायांनी ऊन बाधणार नाही

वर्षभरातील सगळ्यात उष्ण असे दिवस आता सुरू झालेत. उन्हाळा आला की अनेक आजारही सोबत घेऊन येतो. यात पहिल्या क्रमांकावर आहे हीट स्ट्रोक म्हणजेच उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता. उष्माघातापासून कसे बचाव करावा याची माहिती कल्याणच्या फोर्टीस रूग्णालयाचे चीफ इंटेंसिविस्ट आणि फिजिशीअन डॉ. संदीप पाटील यांनी दिलीये.

0
1027
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती म्हणजे तळपता सूर्य आणि घामाच्या धारा… मुंबईसह महाराष्ट्रात प्रचंड उकाडा वाढलाय. अशा वातावरणात आजारांसोबत दवाखान्यांमध्ये रूग्णांच्या रांगाही वाढल्यात. तापमान हे ४० डिग्रीपर्यंत पोहोचलंय. अशावेळी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात लोकांना इतर आजारांसोबत उष्माघात म्हणजेच हिट स्ट्रोकचाही फटका बसतोय.

उष्माघात म्हणजे काय?

बराच वेळ प्रखर आणि जास्त तापमानात राहिल्याने उष्माघाताचा त्रास होतो. यामध्ये डीहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याची तक्रारही जाणवते. त्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवणाऱ्या यंत्रणेवर परिणाम होतो. शरीराचं मूळ तापमान १०४ एफहून अधिक होतं आणि हेच उष्माघाताचं ठळक लक्षण आहे.

शरीरातील पाणी आणि मिठाचं प्रमाण फार कमी झाल्याने उष्माघाताचा त्रास होतो. असा परिस्थितीत व्यक्तीला घामंही येत नाही. अशावेळी गोंधळून जाणं, मळमळणं, झटका येणं, शुद्ध हरपणं असे त्रास होतात. अनेकदा रुग्ण कोमामध्येही जाऊ शकतो.

उष्माघाताची लक्षणं

 • चक्कर येणं
 • प्रचंड डोकेदुखी
 • सुस्ती आणि डोके हलकं झाल्यासारखे वाटणे
 • गरम होत असतानाही घाम न येणं
 • त्वचा लालसर होणं
 • त्वचा गरम आणि कोरडी पडणं
 • स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवणं
 • मळमळणं, उलट्या
 • हृदयाचे ठोके वाढणं
 • जलद गतीने श्वास घेणं
 • गडबडून जाणं
 • आकडी येणं

उपचार काय कराल?

खाली दिलेल्या ६ टप्प्याने रूग्णांवर उपचार करता येऊ शकतात

 • एखाद्या व्यक्तीला उष्माघाताचा त्रास असल्यास तात्काळ त्याला हॉस्पिटलला घेऊन जावं
 • वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाला थंड जागेत ठेवावं
 • रूग्णाला आडवं झोपवून पाय थोड्या उंचीपर्यंत वर करावेत
 • रूग्णाला पाणी द्यावं. रुग्ण शुद्धीत असेल तर स्पोर्ट्स किंवा रिहायड्रेशन ड्रिंक्सही उपयुक्त ठरतील
 • रुग्ण बेशुद्ध असेल तर जवळच्या डॉक्टरांकडे नेऊन आयव्ही लावण्याची व्यवस्था करावी
 • आइस पॅक, स्प्रे किंवा थंड पाण्याने रूग्णाच्या शरीराचं तापमान कमी करावं

उष्माघातापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी

 • भरपूर पाणी प्यावं. दररोज किमान ८ ग्लास पाणी प्यायला हवं
 • थंड पाण्याने आंघोळ करा
 • हलक आणि पोषक आहार घ्या. आहारात काकडी, कलिंगड, नारळ या पदार्थांचा समावेश करा.
 • सैल कपडे आणि कॉटनचे कपडे घाला
 • बराच काळ बाहेर रहावं लागणार असेल तर त्वचेवर किंवा कपड्यांवर थोडंसं पाणी शिंपडा
 • सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत बाहेर पडणं शक्यतो टाळा. जर बाहेर पडणार असाल तर छत्री किंवा टोपीचा वापर करा.
 • अतिरिक्त मद्यपान, साखर असलेलं पेयं, कॅफेन जास्त असलेलं पेय टाळा. कारण यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते
 • अतिप्रमाणात व्यायाम आणि अधिक उष्ण काळात बाहेर व्यायाम करणं टाळा
 • लहान मुलं आणि वृद्धांमध्ये डिहायड्रेशनची लक्षणं दिसतात का यावर लक्ष द्या
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter