ग्रामीण भागात ‘रिअल टाइम टेलिमेडिसीन’ तंत्रज्ञानाचा वापर करणार – आरोग्यमंत्री

ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यांच्या सोयी-सुविधा पोहोचाव्यात म्हणून रिअल टाइम टेलिमेडिसिन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, असं मत सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी व्यक्त केलंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

राज्यातील गावखेड्यात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्यांच्या सोयी-सुविधा पोहोचाव्यात यासाठी रिअल टाइम टेलिमेडिसिन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, असं मत सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी सांगितलंय. इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस द्वारे आयोजित क्रिएटेक या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. सावंत बोलत होतं.

या परिषदेत ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेचे अध्यक्ष माल्कम ग्रँट यांच्यासह ब्रिटनमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या १३ संस्थांचे शिष्टमंडळ सहभागी झालेत. ८ फेब्रुवारीपर्यंत हे भारत दौऱ्यावर असतील. दिल्ली, मुंबई,  हैद्राबाद या महानगरांमध्ये या काळात परिसंवाद आयोजित केले जात आहे. आरोग्य सेवा क्षेत्रातील नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या वापराने आजारांवर मात करणे हा या परिषदे मागील मुख्य उद्देश आहे.

या परिषदेत शहरी भागातील लोकांच्या तुलनेत ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचा आजही तुटवडा जाणवतोय. या मुद्द्यावर बोलताना गावखेड्यातील नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं डॉ. सावंत यांनी म्हटलंय.

ग्रामीण भागात डॉक्टरांची उपलब्धता हा चिंतेचा विषय आहे. सरकारद्वारे वेळोवेळी डॉक्टर पदभरतीच्या जाहिराती दिल्या जातात. परंतु, ग्रामीण भागात काम करण्यास तज्ज्ञ डॉक्टर तयार होत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी वैद्यकीय सुविधांचा बोजवारा पाहायला मिळतोय. या स्थितीवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक असल्यानं महाराष्ट्रातील ग्रामीण भागात रिअल टाइम टेलिमेडिसिन हा पर्याय निवडण्याचा विचार सुरू आहे.

डॉ. सावंत यांनी पुढे सांगितलं की, “टेलिमेडिसिन हा पर्याय आता पुढे येऊ लागला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून केवळ रुग्णाचे वैद्यकीय रिपोर्ट न पाहता, ग्रामीण भागातील रुग्णाचे हृदयाचे ठोके मुंबईत बसलेल्या डॉक्टरला ऐकता येऊ शकतील. त्यामुळे या रुग्णांना मुंबईत येऊन उपचार घेण्याची गरज नसून तेथेच राहून रुग्णांवर उपचाराचा सल्ला देणं शक्य होणार आहे.”

“रिअल टाइम टेलिमेडिसिन हे ऑनलाईन ‘लाइव्ह’ रुग्ण तपासणी असेल आणि ज्याला भौगोलिक परिस्थितीचे बंधन नसेल. याशिवाय रुग्णवाहिकांना ‘जीपीएस’ प्रणाली बसविणे, विशेष नवजात दक्षता केंद्रांचे श्रेणीवर्धन करणे, या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं जाईल,” असंही डॉ. सावंत यांनी नमूद केलं.

ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या बाईक अॅम्ब्युलन्समुळे मुंबईत मागील सहा महिन्यात १,३०० रुग्णांना जीवदान मिळालं आहे. हे पाहून मुंबईत आणखीन १० तर राज्यातील दुर्गम भागात २० बाईक अॅम्ब्युलन्स सुरू करणार आहोत, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)