प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पूनम सातपुतेंच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात शोककळा

डॉ. पूनम सातपुते प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. राष्ट्रीय स्तरावरील स्त्रीरोगतज्ज्ञांची संघटना ‘फॉग्झी’च्या सदस्य होत्या. डॉ. पूनम यांचा मृतदेह त्यांच्या अंधेरीतील राहत्या घरी आढळून आला. त्यांच्या अचानक निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

कोण होत्या डॉ. पूनम सातपुते?

  • डॉ. पूनम सातपुतेंनी आपलं वैद्यकीय शिक्षण सेठ जीएस मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयातून तर पुढील शिक्षण सर जे.जे रुग्णालयातून पूर्ण केलं
  • डॉ. पूनम सातपुते रोबोटीक सर्जरीसाठी प्रसिद्ध होत्या
  • सायन रुग्णालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर डॉ. पूनम चार वर्ष सिंगापूरला होत्या
  • सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये त्यांनी चार वर्ष रोबोटीक सर्जरी विभागाच्या प्रमुख म्हणून काम केलं.
  • चेन्नई अपोलो रुग्णालयाच्या रोबोटीक सर्जरी विभागाच्या प्रमुख म्हणून डॉ. पूनम यांनी काम पाहिलं
  • गेल्या ६-७ वर्षांपासून डॉ. पूनम अंधेरी भागात प्रॅक्टिस करत होत्या

डॉ. सातपुतेंबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना सायन रुग्णालयातील त्यांचे सहकारी डॉ. निरंजन चव्हाण म्हणाले, “डॉ. सातपुते खूप साधं व्यक्तीमत्व होतं. त्या नेहमी सकारात्मक असायच्या. गाणी, शेर-शायरी त्यांना खूप आवडायचं. त्याची ओळख रोबोटीक आणि लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेतील मास्टर म्हणून केली जायची. एक सर्जन म्हणून त्या खूप चांगल्या होत्या.”

डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सातपुते गेल्या काही वर्षांपासून मधुमेहाने ग्रस्त होत्या. त्यांचा मधुमेह फार जास्त होता. त्यांचं पार्थिव पोस्टमार्टमसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आलंय.

डॉ. सातपुतेंच्या आठवणींना उजाळा देताना प्रसिद्ध आयव्हीएफतज्ज्ञ डॉ. नंदीता पालशेतकर म्हणतात, “त्या खूप मनमिळावू होत्या. रोबोटीक सर्जन म्हणून ज्युनिअर डॉक्टरांसाठी एक प्रेरणा होत्या. डॉ. पूनम आता या जगात नाहीत यावर विश्वासच बसत नाही.”

देशभरातील स्त्रीरोगतज्ज्ञांची नोव्हेंबर महिन्यात मुंबईत एक परिषद आयोजित करण्यात आली होती. डॉ. सातपुते या परिषदेला उपस्थित होत्या. स्त्रीरोगतज्ज्ञांच्या संघटनेच्या अध्यक्ष डॉ. रेष्मा डिल्लोन-पै म्हणतात, “ डॉ. पूनमच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्काच बसलाय. आयुष्य जगणारी म्हणून आम्ही तिला ओळखायचो.”

तर, सर जे.जे रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक आनंद म्हणाले, “बुधवारी डॉ. सातपुते मला भेटणार होत्या. एक खूप चांगली सर्जन, खूप चांगली व्यक्ती आणि आनंदी व्यक्तीमत्व होतं डॉ. पूनम यांचं. त्यांचं निधन म्हणजे एक खूप मोठा धक्का आहे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter