चहा-कॉफीचं अति सेवन डोकेदुखीला निमंत्रण

तुम्हाला मायग्रेनची समस्या असेल आणि तुम्ही अति प्रमाणात चहा-कॉफीचं सेवन करत असाल तर तुमची मायग्रेनची समस्या अधिक तीव्र होते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

‘अरे यार चल मला आता काम करून कंटाळा आला आहे, डोकंसुद्धा खूप दुखू लागलं आहे… चहा किंवा कॉफी काहीतरी पिऊन येऊया…’ ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची अशीच परिस्थिती असते. त्यापैकीच एक म्हणजे मुंबईत राहणारी 27 वर्षांची प्रीती…

ऑफिसमध्ये प्रीतीला वारंवार चहा लागायचा… चहा प्यायल्याने कामाला उत्साह येतो, शिवाय डोकेदुखी बरी होती, असं तिचं मत… आपली डोकेदुखी थांबावी यासाठी प्रीती चहा प्यायची खरं मात्र हाच चहा तिची ही डोकेदुखी नकळत आणखी तीव्र करत होता. कारण प्रीतीला मायग्रेनची समस्या होती.

प्रीतीच्या डोक्याच्या एका बाजूला तीव्र अशा असह्य वेदना व्हायच्या. ती डॉक्टरांकडे गेली, तेव्हा डॉक्टरांनी तिला ‘तू चहा किंवा कॉफी जास्त पितेस का?’ असं विचारलं. प्रीतीला काही समजेच ना… प्रीतीनं आपण दिवसातून 5 पेक्षा जास्त वेळा चहा पित असल्याचं सांगताच डॉक्टरांनी तिला तात्काळ चहा बंद करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रीतीनं चहा बंद केला नाही, मात्र चहाचं प्रमाण कमी केलं. त्यानंतर तिला तिच्या डोकेदुखीचं प्रमाणही कमी झाल्याचं दिसून आलं.

डॉक्टरांनी प्रीतीला मायग्रेनची समस्या असल्याचं सांगितलं, चहा-कॉफीच्या सेवनामुळे तिची मायग्रेनची समस्या अधिक तीव्र होत होती.

कॅफिनेच्या अति सेवनामुळे मायग्रेन तीव्र होतो – संशोधन

मायग्रेन आणि चहा-कॉफीच्या सेवनाचा काही संबंध आहे, याबाबत संशोधन झालं, अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.

या संशोधनानुसार अति प्रमाणात कॅफिनेचं सेवन केल्यानं मायग्रेनची तीव्रता वाढते, असं दिसून आलं आहे.

संशोधकांनी मायग्रेनची तीव्र समस्या असलेल्या 98 लोकांचा अभ्यास केला. 6 आठवडे या व्यक्तींना चहा, कॉफी, सोडा आणि इतर एनर्जी ड्रिंकच्या सेवनाचं प्रमाण, त्यांची शारीरिक कार्य, ताणाची पातळी आणि झोप याबाबत नोंद करण्यास सांगितलं.

संशोधकांना दिसून आलं की,

  • जे लोक 3 किंवा त्यापेक्षा जास्त कॅफिनेचं सेवन करतात त्यांना त्याच दिवशी किंवा पुढच्या दिवशी मायग्रेनची तीव्रता 40 टक्क्यांनी वाढते
  • तर जे लोक एक ते 2 कप कॅफिनेचं सेवन करतात त्यांना त्या दिवशी किंवा पुढची दिवशी मायग्रेनची समस्या दिसून आलेली नाही.

म्हणजे तुम्हाला मायग्रेनची समस्या असेल तर तुमच्या चहा-कॉफीच्या सेवनावर नियंत्रण आणायला हवं. खरं तर अशा व्यक्तींनी चहा-कॉफी पिऊच नये, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना डॉ. प्रज्वलित सोनकांबळे म्हणाले, “पोटात अन्नपचनासाठी असिड असतं. ही असिडीटी वाढल्यामुळे मेंदूतील एका भागावर परिणाम होतो, त्यामुळे डोकेदुखी होते. या परिस्थितीत पूर्ण किंवा अर्ध डोकं होतं. चहा-कॉफीमुळे ही समस्या अधिक तीव्र होते. त्यामुळे मायग्रेन असलेल्यांनी शक्यतो चहा-कॉफी पिऊच नये, असा सल्ला मी देतो”

त्यामुळे तुम्हालाही मायग्रेनची समस्या असेल तर चहा-कॉफीपासून दूरच राहणं तुमच्या फायद्याचं आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here