पावसाळा आला…त्वचेला सांभाळा

पावसाळ्याच्या दिवसांत त्वचेचे रोग, अलर्जी इत्यादी समस्या उद्भवण्य़ाची शक्यता असते. अशा दिवसांत त्वचेची काळजी कशी घ्यायची याची माहिती क्युटीस स्किन स्टुडियोच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अप्रतिम गोयल यांनी दिलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

राज्यात पावसाला सुरुवात झालीये. आतापर्यंत प्रत्येकाने एव्हाना पावसासोबत मसाला चहा, गरमागरम भजी- समोसे यांचा आनंदही घेतला असेल. पाऊस आल्याचा आनंद हा प्रत्येकाला असतो. एप्रिल आणि मेच्या उन्हापासून आराम मिळावा यासाठी पाऊस येताना स्वतःसोबत थंडावा तर घेऊन येतोच मात्र त्यासोबत त्वचेच्या समस्याही आणतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासोबत त्वचेचंही आरोग्य जपलं पाहिजे.

पावसाळ्याच्या दिवसांत त्वचेचे रोग, अॅलर्जी इत्यादी समस्या उद्भवण्य़ाची शक्यता असते. ओले कपडे तसंच पाण्यात सतत पाय राहिले तर फंगस, इन्फेक्शनही होतं. याशिवाय पहिला पावसाच्या पाण्यात अॅसिडचं प्रमाण जास्त असल्याने हे पाणी त्वचेच्या आरोग्यासाठी फार घातक असतं.

पावसाळ्यात त्वचेसंबंधी उद्भवणाऱ्या समस्या

इन्फेक्शन

पावसाळ्यात बंद चपलांचा वापर केल्य़ाने फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. ही समस्या शक्यतो पुरुषांमध्ये दिसून येते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो पाणी साचून राहिल अशा चपला घालू नये. शिवाय बाहेरून आल्यावर स्वच्छ पाय धुवावे. पायांना इन्फेक्शन होऊ नये यासाठी क्रिम लावावं

नायटा

पावसाळ्याच्या दिवसांत अजून एक त्वचेसंदर्भात जाणवणारी समस्या म्हणजे नाय़टा. यामध्ये व्यक्तीच्या त्वचेला फार खाज येते. ज्या भागाला खाज येते त्या भागाची त्वचा सुकते आणि लाल होते. ही समस्या मधुमेही रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते.

खरूज

खरूज ही नायटासारखी त्वचेची समस्या असून यामध्येही त्वचेला खाज येते. यामध्ये बोटांच्या भेगा, हा किंवा पाय दुमडण्याच्या ठिकाणी खाज येते. ही तक्रार उद्भवल्यास त्वरित त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. खरूज व्यक्तीच्या संपर्कात आल्याने इतर व्यक्तीलाही हा त्रास होऊ शकतो. लहान मुलांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येते.

इतर तक्रारी

या आजारांसह पावसाळ्यात आणखी उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्या म्हणजे त्वचा सुरकुतणं, शरीराला दुर्गंधी येणं इत्यादी.

पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल?

क्लिनसिंग

पावसाच्या पाण्यात केमिकलचं प्रमाण असतं. त्यामुळे पावसाळ्यात योग्य प्रकारे क्लिनसिंग म्हणजे त्वचा साफ करणं गरजेचं असतं. अशा दिवसांत मेक अप काढण्यासाठी मिल्क क्लिनसिंगचा वापर करावा. चेहरा सातत्याने धुवावा जेणेकरून त्वचेला श्वास घेता येऊ शकतो.

टोनिंग

टोनिंग हे क्लिनसिंग नंतर वापरावं. अॅन्टी बॅक्टेरियल टोनर वापरल्याने त्वचेला इन्फेक्शन होत नाही.

मॉइस्चरायझर

उन्हाळ्यात मॉइस्चरायझर लावणं जितकं महत्त्वाचं आहे तितकचं ते पावसाळ्यतही लावलं पाहिजे. पावसाळ्यातील हवामानामुळे त्वचा कोरडी होते. यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी मॉइस्चरायझरचा वापर करावा. त्यामुळे दररोज रात्री प्रत्येकाने मॉइस्चरायझर लावावं.

सनस्क्रिन

पावसाळ्यात सनस्क्रिन लावल्याशिवाय बाहेर पडू नका. अशा दिवसांतही तुमच्या त्वचेचं युव्ही किरणांपासून संरक्षण होणं गरजेचं असतं. घरातून बाहेर पडण्याच्या 20 मनिटं अगोदर त्याशिवाय दर चार तासांची त्वचेला सनस्क्रिन लावा.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter