जुलै महिन्यात लेप्टोमुळे तिघांचा मृत्यू

मुंबईत स्वाईन फ्लूने डोकं वर काढलेलं असताना आता लेप्टोनेही पाय पसरायला सुरूवात केली आहे. जुलै महिन्यात लेप्टोमुळे तिघांना जीव गमवावा लागलाय. तर लेप्टोच्या ५२ नवीन रुग्णांची पालिकेच्या विविध रुग्णालयांत नोंद झालीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मुंबईत १ ते १५ जुलै या काळात लेप्टोस्पायरोसिसच्या २८ रुग्णांची नोंद झालीये. तर, १६ ते २६ या दहा दिवसात लेप्टोचे २४ रुग्ण आढळून आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिलीये. एकाच्या मृत्यू झाला आहे. यावरून केवळ जुलै महिन्यात लेप्टोमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दहा दिवसात एका व्यक्तीचा लेप्टोमुळे मृत्यू झालाय.

लेप्टो हा प्राण्यांच्या मलमूत्रांपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे. २०१५ मध्ये मुंबईत लेप्टोने थैमान घातले होते. त्यावेळी मुंबईत लेप्टोने बाधित १९ जणांना जीव गमवावा लागला होता. तर २०१६ मध्ये १८० लेप्टोच्या रुग्णांची नोंद पालिकेच्या विविध रुग्णालयांत करण्यात आली होती. त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला होता. तर यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात तिघांचा लेप्टोमुळे मृत्यू झाला आहे.

मागील वर्षी लेप्टोचे वाढते रुग्ण लक्षात घेता यंदाच्या वर्षी पालिका प्रशासनाने या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पावसाळ्यापूर्वीच उपाययोजनांना सुरूवात केली होती. “यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे झोपडपट्टयांमध्ये घरोघरी जाऊन विविध आजारांसंदर्भात जनजागृती केली जातेय. त्यामुळे लेप्टोचा प्रसार कमी होण्यास मदत होत आहे,” अशी माहिती ग्लोबल रुग्णालयाच्या संसर्गजन्य विभागाचे तज्ज्ञ डॉ. वसंत नागवेकर यांनी दिली.

“पावसाळ्यात लेप्टोचे सर्वांधिक रुग्ण आढळून येतात. मागील वर्षी रुग्णांची संख्या अधिक होती. त्यामुळे पायाला जखम झालेली असल्यास पावसाच्या पाण्यातून चालताना अनेकदा संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांना पाण्यातून चालताना काळजी घ्यावी,” असे सल्लाही डॉ. ओम श्रीवास्तव यांनी दिला आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter