‘हुक्का पार्लर’वर निर्बंध आणण्याासाठी कायदा करणार- मुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात 'हुक्का पार्लर'वर निर्बंध घालण्यासाठी कायदा करण्याची ग्वाही दिलीये. हुक्क्याच्या नावाखाली अंमली पदार्थांची विक्री होते, अशी माहिती सरकारकडे आहे. त्यामुळे लवकरच हुक्का पार्लरबाबत कायदा करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. कमला मिलमध्ये लागलेली आग हुक्कामुळेच लागल्याचं चौकशीत समोर आलं होतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • राज्य सरकार घालणार ‘हुक्का पार्लर’वर निर्बंध
  • महाराष्ट्र सरकार करणार ‘हुक्का’बाबत ठोस कायदा
  • हुक्क्यात नशेसाठी काही गोष्टी मिसळल्या जात असल्याची सरकारकडे माहिती
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबईतील प्रसिद्ध ‘कमला मिल्स’च्या अग्नितांडवात १४ निष्पापांचा मृत्यू झाला. अवैध पद्धतीने खुलेआमपणे विकल्या जाणाऱ्या हुक्क्याने लोकांचा बळी घेतला. या अग्नितांडवानंतर सरकारचे डोळे उघडले आणि सरकारने अवैध हुक्का पार्लरविरोधात कारवाई सुरू केली.

अवैध हुक्काचा मुद्दा सोमवारी विधानपरिषदेत गाजला. राज्य सरकारकडून उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्यात हुक्का पार्लरवर निर्बंध घालण्यासाठी सरकार नवा कायदा आणणार आहे. हुक्का पार्लरच्या माध्यमातून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याने यावर निर्बंध घालणं गरजेचं आहे. या कायद्याचं प्रारूप तयार असून लवकरच यासंबंधीचं विधेयक विधिमंडळात मांडणार आहोत.”

मुंबईतील कमला मिल्समधील “मोजो बिस्ट्रो” आणि “वन अबव्ह” या बारला लागलेल्या भीषण आगीचा मुद्दा काँग्रेसचे  आमदार संजय दत्त यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील यांनी हुक्का पार्लरवर नियंत्रण नसल्याचं निदर्शनाला आणून दिलं.

‘कमला मिल्स’ला लागलेली आग अवैधपणे विकल्या जाणाऱ्या हुक्क्यामुळेच लागली होती. मुंबईचे महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर यांनीही अवैध हुक्का पार्लरवर कारवाई करा अशी मागणी मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून केली होती.

दरम्यान काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी, मुंबईत झालेल्या स्वाभिमान संघटनेच्या आंदोलनाला यश आल्याची प्रतिक्रिया ट्विटरवरून दिलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter