पटापट चाला… पुढे धोका आहे

हळू चालणाऱ्या व्यक्तींना भविष्यात काही अंतरदेखील चालणं शक्य होत नाही. अशा व्यक्तींना भविष्यात क्रोनिक मोबिलिटी डिसॅबिलिटी उद्भवू शकतो, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.

Walk Feet Legs Walking Shoes Strolling People
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

अरे किती हळू चालतो… पटापट चाल जरा… उशीर झाला असल्यास आपल्यासोबतचा व्यक्ती आपल्याला असा सल्ला देतो… मात्र आता तुमच्या चालण्याचा वेग मित्रमैत्रीण सांगतात म्हणून नाही तर भविष्यातील धोका टाळण्यासाठी तुम्हाला वाढवावा लागेल… कारण हळू चाललात तर भविष्यात तुम्ही अजिबातच चालू शकणार नाही, असं एका अभ्यासातून दिसून आलं आहे.

जर्नल ऑफ अमेरिकन जेरियाट्रिक्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.

संशोधकांनी यूएसमधील 70 ते 79 वयोगटातील 337 व्यक्तींचा अभ्यास केला. अभ्यासाच्या सुरुवातीला या व्यक्तींना चालताना किंवा जिने चढताना कोणतीही समस्या जाणवत नव्हती. अभ्यासादरम्यान या व्यक्तींना विविध रस्त्यांवर चालण्यास सांगितलं, तसंच रस्त्यावर अनेक अडथळे ठेवून चालण्यास सांगितलं आणि त्यांच्या चालण्याचा वेग तपासला. दर 6 महिन्यांनी त्याचा फॉलोअप घेण्यात आला.

8 वर्षांनंतर निम्म्यापेक्षा अधिक व्यक्तींना चालताना समस्या उद्भवू लागली. त्यांना काही मैलदेखील चालता येत नव्हतं.

जवळपास 40 टक्के व्यक्तींना क्रोनिक मोबिलिटी डिसॅबिलिटी उद्भवली. साध्या किंवा अडथळे असलेल्या दोन्ही रस्त्यांवरून चालणाऱ्या व्यक्तींना याचा धोका असल्याचं दिसून आलं.

ज्या व्यक्तींना आपल्याला चालताना समस्या जाणवत असल्याचं सांगितलं, त्यामध्ये सर्वाधिक महिला होत्या. ज्यांना मधुमेह, लठ्ठपणा, गुडघेदुखी आणि श्वासोच्छवासाची समस्या होती. तसंच त्यांच्यामध्ये डिप्रेशनची लक्षणंही दिसून आली.

चालण्याच्या गतीवरून भविष्यात त्या व्यक्तीला अपंगत्व बळावणार की नाही याचा अंदाज बांधता येणार असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.

त्यामुळे तुम्हीदेखील हळू चालत असाल तर आताच तुमच्या चालण्याचा वेग वाढवा आणि भविष्यातील धोका टाळा.

सोर्स – सायन्स डेली

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter