#LungCancerAwarenessMonth- जाणून घ्या फुफ्फुसांच्या कर्करोगाची लक्षणं…

जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार, दरवर्षी जगभरात जवळपास ७.६ दशलक्ष व्यक्तींचा मृत्यू हा कॅन्सरने होतो. तर या मध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या गंभीर कर्करोगावर मात करण्यासाठी याची लक्षणं समजून घेणं फार गरजेचं आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

फुफ्फुसांच्या कर्करोगामध्ये दोन्ही फुफ्फुसांमध्ये कर्करोगाच्या पेशी तयार होतात, फुफ्फुसामध्ये ज्या ठिकाणीहून हवा प्रसारित होते त्याच ठिकाणी शक्यतो या पेशी तयार होतात.

खाली दिलेल्या लक्षणांपैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बोटांची टोकं रूंद किंवा जाड होणं

फुफ्फुसांच्या कर्करोगामध्ये बोटाची टोकं रूंद होणं किंवा जाड होण्याची परिस्थिती उद्भवते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, फुफ्फुसाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला ही समस्या उद्भवते. मात्र सगळ्यांनाचा या समस्येला सामोरं जावं लागत नाही. १०० पैकी जवळपास ५ व्यक्तींमध्ये ही तक्रार दिसून येते.

मान आणि चेहऱ्याचा भाग सुजणं

चेहरा आणि मानेच्या बाजूचा जर काही भाग सुजत असेल तर हे फुफ्फुसांच्या कर्करोगाचं लक्षणं असू शकतं. याचं कारणं असं की, फुफ्फुसांमध्ये वाढणाऱ्या कर्करोगाच्या पेशी रक्तवाहिन्यांवर दाब देतात. या रक्तवाहिन्या डोक्याला रक्तपुरवठा करणाऱ्या असतात. त्यामुळे पुरेसा रक्तपुरवठा न झाल्याने सुज येते.

हाडं दुखणं

पाठ किंवा हिपचा भाग सतत वेदना देत असेल तर डॉक्टरांची भेट घेणं फायद्याचं ठरेल. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या सांगण्यानुसार, अशा प्रकारतं दुखणं फुफ्फुसांच्या कर्करोगाचं लक्षणं असू शकतं. असं होण्याचं कारण की, कॅन्सरच्या पेशी इतर अवयवांमध्ये पसरण्यास सुरुवात होते.

बराच काळ असणारा खोकला

अनेक फुफ्फुसांच्या कर्करोगांच्या रूग्णांमध्ये सतत खोकल्याचा त्रास दिसून येतो. अनेकदा हा त्रास अनेक महिने रूग्णाला सतावतो. त्यामुळे दोन किंवा तीन आठवड्यांवर खोकला बरा होत नसल्यास तपासणी करून घ्यावी.

थकवा येणं

छोट्या छोट्या गोष्टींमुळे सतत थकवा येणं हे देखील फुफ्फुसांच्या कर्करोगाचं लक्षणं मानलं जातं. कॅन्सरमुळे शरीरातील रक्तात केमिकल मिसळलं जातं. हे केमिकल रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीवर विपरीत परिणाम करतं. यामुळे व्यक्तीला सतत थकवा जाणवतो.

कॅल्शियमच्या पातळीत वाढ

फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे शरीरातील कॅल्शियमच्या पातळीत वाढ होते. रक्तातील कॅल्शियमध्ये प्रमाणाच्या बाहेर वाढ होणं हे आरोग्यासाठी धोकादायक ठरतं. यामुळे रूग्ण कोमात जातो किंवा मृत्यू होण्याची देखील शक्यता असते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter