‘ती’ने मृत्यूला डोळ्यांनी पाहिलंय…

घाटकोपरच्या श्रेयस सिनेमागृहाजवळ ४० वर्ष जुनी साईदर्शन इमारत मंगळवारी कोसळली. या दुर्घटनेत २० वर्षांची वर्षा सपकाळ वाचली. काय झालं होतं त्या दिवशी, वर्षाने 'माय मेडिकल मंत्रा'ला याची माहिती दिली.

0
122
‘ती’ने मृत्यूला डोळ्यांनी पाहिलंय...
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

कामगार जोरजोरात भिंतीवर ठोकत होते… अचानक रहिवाशांची आरडा-ओरड सुरू झाली… किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. इमारत भूकंप आल्यासारखी हादरत होती… आणि…क्षणातच…काही कळायच्या आत इमारत कोसळली. जे घडायला नको होतं अखेर तेच झालं…

तुम्हाला ऐकून हादरा बसला असेल… पण, वर्षाने हे सर्व अनुभवलंय. काही क्षणातच…होत्याचं नव्हतं झालं. वर्षाने त्या प्रत्येक क्षणाचा अनुभव ‘माय मेडिकल मंत्रा’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितला.

वर्षा सांगते, “दुर्घटनेच्या दिवशी मंगळवारी सकाळी कामगारांनी काम सुरू केलं. इमारतीच्या मागच्या बाजूचा स्लॅप कोसळून मोठा आवाज झाला. माझ्यासोबत काम करणाऱ्या दोन्ही मुली खाली नर्सिंग होममध्ये गेल्या. मी एकटीच कार्यालयात होते. अचानक रहिवाशांचा आरडा-ओरडा ऐकू येऊ लागला. नेमकं काय घडलं काही कळत नव्हतं. कार्यालयातून बाहेर गॅलेरीत आले तेव्हा इमारत अक्षरशः भूकंप आल्यासारखी हलू लागली होती. सुरुवातीला मला हा माझा भास असल्याचे वाटले. पण, मी पुढे काही विचार करायच्या आतच इमारत कोसळली.”

वर्षा पुढे सांगते, “जीव वाचवण्यासाठी माझ्यापुढे एक महिला बाळाला घेऊन धावत होती. आम्ही गॅलेरीत असल्याने बाहेर फेकलो गेलो. माझा कमरेपर्यंतचा भाग ढिगाऱ्याखाली गाडला गेला. अशा स्थितीत मी सर्व ताकद पणाला लावून माझ्यावर पडलेला स्लॅब हाताने बाजूला सारला. आणि वाचवा… वाचवा… म्हणून ओरडू लागले. त्यावेळी आजूबाजूला राहणाऱ्या महिलांनी मला बाहेर काढले.”

“माझ्या पुढ्यात गॅलेरीत धावणारी महिला आपल्या बाळासह त्या ढिगाऱ्यात अडकली होती. तिचा फक्त हातच माझ्या हाताला लागत होता. मी तिचा हात पकडून ओढण्याचा प्रयत्न केला. पण, तिचा हात गार पडला होता… त्यानंतर कळलं की, आई आणि बाळ दोघांचाही मृत्यू झाला. कदाचित माझं आयुष्य होतं म्हणून मी वाचले.”

वर्षाने दिलेल्या माहितीनुसार, “गेल्या काही महिन्यांपासून नर्सिंग होमच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. काम करताना कामगार जोरजोरात भिंतींवर ठोकायचे. त्यामुळे अनेकदा इमारतीला हादरे बसायचे. इमारतीच्या रहिवाशांनी अनेकदा, “काम हळूहळू करा”, असे बजावलं होतं. पण रहिवाशांच्या म्हणण्याकडे कानाडोळा करत हा प्रकार अनेक दिवस सुरूच होता. अखेर… जे घडायला नको होते, तेच घडले.”

“नर्सिंग होमची दुरुस्ती फक्त डागडुजी पुरती मर्यादित नव्हती, तर नर्सिंग होमची पूर्ण रचनाच बदलली जात होती. या नर्सिंग होमचे एक कार्यालय पहिल्या मजल्यावर आहे. हे कार्यालय म्हणजे वन बीएचके फ्लॅट आहे. या कार्यालयात फक्त आम्ही तीनच जण असल्याने बरीच जागा मोकळी राहायची. त्यामुळे ही जागाही नर्सिंग होमसाठी वापरून नवीन पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याचा विचार होता.”

वर्षा सपकाळ गेल्या तीन महिन्यांपासून सितम नर्सिंग होममध्ये काम करतेय. कॉलेजसोबतच घराला हातभार लागावा यासाठी तिने अकाउंटंटची नोकरी सुरू केली. पण, मंगळवारची सकाळ ती कधीच विसरू करणार नाही. मृत्यूला तिने आपल्या डोळ्यांनी पाहिलंय…

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter