MRI मशिन अपघात: डॉ. शहांना इंडियन रेडियोलॉजीकल अॅन्ड एमेजिंग असोसिएशनचा पाठिंबा

२७ जानेवारीला नायर रुग्णालयात एमआरआय मशिनमध्ये खेचला गेल्याने एका तरूणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी ड्यूटीवर असलेले डॉ. सिद्धांत शहा यांना अटक केली. पण, डॉ. शहा यांच्या अटकेचा इंडियन रेडियोलॉजी अॅन्ड एमेजिंग असोसिएशनने विरोध केलाय. या प्रकरणी संघटनेचे सदस्य पालिका आयुक्त आणि नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता यांची भेट घेणार आहेत.

0
141
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मुंबईच्या नायर रुग्णालयातील एमआरआय मशिनमध्ये खेचला गेल्याने २७ जानेवारीला ३२ वर्षीय राजेश मारूचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी रेडियोलॉजीकल विभागाचे डॉक्टर सिद्धांत शहा यांना निष्काळजीपणाच्या गुन्ह्याखाली अटक केली. पण, डॉ. शहा यांनी कोणताही पुरावा नसताना अटक झाल्याचा आरोप इंडियन रेडियोलॉजीकल अॅन्ड एमेजिंग असोसिएशनने केलाय.

इंडियन रेडियोलॉजीकल अॅन्ड एमेजिंग असोसिएशनने, नायर रुग्णालयातील या अपघाताप्रकरणी डॉ. सिद्धांत शहा, यांना पाठिंबा दर्शवलाय. देशभरातील रेडियोलॉजिस्टची संघटना येत्या काही दिवसात पोलीस कारवाईच्या मुद्यावर मुंबई महापालिका आयुक्त आणि नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता यांची भेट घेणार आहे.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना इंडियन रेडियोलॉजीकल अॅन्ड एमेजिंग असोसिएशनचे माजी महासचिव डॉ. जिग्नेश ठक्कर म्हणतात, “रूग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाला. पण यात डॉ. सिद्धांत शहा यांना ओढण्यात आलं आहे. कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना केवळ चौकशीसाठी बोलवण्यात आल्यानंतर अचानक अटक करणं हे चुकीचं आहे.”

डॉ. ठक्कर पुढे म्हणाले, “अनेकदा चूक नसताना रेडियोलॉजी तज्ज्ञांना दोषी ठरवलं जातं. एमआरआय रूममध्ये काम करत असताना बाहेर काय सुरू आहे हे डॉक्टर पाहू शकत नाही. नेमकं काय घडलं हे जाणून न घेता अचानक डॉ. शाह यांना अटक करणं हे गैर आहे. तसं असल्यास हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्यानं रेडियोलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर किंवा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांना अटक का केली नाही.”

या प्रकरणी रेडियोलॉजीकल अॅन्ड एमेजिंग असोसिएशन सदस्यांशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवणार आहेत.

२७ जानेवारीला, मुंबईतील नायर रुग्णालयात एका वृद्ध महिलेला उपचारांसाठी आणण्यात आलं होतं. राजेश मारू या महिलेसोबत उपस्थित होता. राजेशच्या कुटुंबीयांचा आरोप आहे, की त्यांना ड्यूटीवर असलेल्या वॉर्डबॉयने एमआरआय मशिन बंद असल्याचं सांगत, रूममध्ये ऑक्सिजनचा सिंलेंडर घेऊन जाण्याची परवानगी दिली. मात्र, राजेश रूममध्ये शिरताच मशिनने त्याला खेचून घेतलं. राजेश, गंभीरित्या जखमी झाला. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

राजेशच्या कुटुंबीयांच्या आरोपावरून पोलिसांनी वॉर्डबॉय विठ्ठल चव्हाण आणि आया सुनिता सर्वे यांना अटक केली. त्याचसोबत डॉ. सिद्धांत शहा यांच्यावरही निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. डॉ. सिद्धांत यांना चौकशीनंतर पोलिसांनी अटक केली होती. रुग्णालयाचे चौकशीसाठी तिघांनाही निलंबित केलंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter