जाणून घ्या: शंभरवर्ष जगण्यासाठी कसे फिट राहतात डॉ. सावजी?

वयाच्या ५६ व्या वर्षीही डॉ. अविनाश सावजी फिट आहेत. वयाची शंभरी गाठेपर्यंत त्यांना सामाजिक कामासाठी कार्यरत राहाणं हा त्यांचा उद्देश आहे. ते फिट कसे राहतात हे जाणून घ्या...

0
1345
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

अमरावतीमधल्या प्रयास या सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि संचालक डॉ. अविनाश सावजी यांची एक इच्छा आहे. त्यांना आपला १००वा वाढदिवस सर्वांच्या उपस्थितीत साजरा करायचा आहे. शिवाय त्यांना वयाच्या शंभरी पर्यंत कार्यरत राहायचंय. “मला अजून भरपूर काम करायचं आहे. वयाच्या शंभर वर्षांपर्यंत कार्यरत राहावं हीच माझी इच्छा आहे. त्यामुळे मला आजारपणात माझा वेळ वाया नाही घालवायचा. म्हणून मला फीट रहायचंय,” असं डॉ. सावजी यांनी सांगितलं.

insert-1 (5)

प्रयास संस्थेमार्फत शारीरिक, मानसिक, सामाजिक तसंच अध्यात्मिक आरोग्य सुधारण्याचं काम करण्यात येतं. फिटनेस कसा राखावा यासाठी डॉ. सावजी विविध कार्यशाळाही घेतात. वयाच्या ५६ व्या वर्षीही ते फिट आहेत आणि म्हणूनच फिटनेसच्या संदर्भात ते अनेकांचा आदर्शही आहेत.

डॉ. अविनाश सावजी आठवड्यातून किमान ५ दिवस ५-६ किमी पायी चालतात. त्याचसोबत मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यसाठी ते योगासनंही करतात. कामामुळे महिन्यातून किमान १५ दिवस ते प्रवासातच असतात. अशावेळीही ते व्यायामासाठी वेळ काढतात. .

प्रवासादरम्यान डॉ. सावजी कसे फीट राहतात

  • शक्यतोवर ते पायऱ्यांचा वापर करतात
  • बस किंवा ट्रेनमध्ये शक्य असल्यास योगासनं करतात
  • ट्रेन येईपर्यंत रेल्वे प्लॅटफॉर्मवर चालतात

याविषयी डॉ. सावजी सांगतात की, “मी जरी प्रवासात असलो तरी दुसऱ्या पद्धतींच्या माध्यमातून व्यायाम करतो. वेळ मिळेल तिथे आणि शक्य असेल तेव्हा मी व्यायामासाठी वेळ काढतो.”

आपल्या आहाराचा फीटनेसशी खूप जवऴचा संबंध आहे. डॉ. सावजी देखील आपल्या आहाराची विशेष काळजी घेतात.

डॉ. सावजींनी आहाराविषयी दिलेल्या टीप्स

  • तेलकट आणि तिखट पदार्थ खाणं टाळा
  • गोड पदार्थ मर्यादेत खा
  • गोड पदार्थ खाल्यानंतर जास्त व्यायाम करा जेणेकरून कॅलरीचं प्रमाण कमी होईल
डॉ. अविनाश सावजी
डॉ. अविनाश सावजी

“आहारसंबंधी काही पथ्यं मी आवर्जून पाळतो. पण एखादी गोष्ट मी खाणारंच नाही हा अट्टहासही मी करत नाही. समोर श्रीखंड किंवा इतर कुठला गोड पदार्थ आल्यास त्याला नाकारत नाही. पण नंतर जास्त व्यायाम करतो. खूप कडक नियम पाळल्यास आपण आयुष्याचा आनंद घेऊ शकणार नाही. आपलं लवचिक धोरण असायला हवं.” असं डॉ. सावजी यांनी सांगितलं.

 

डॉ. सावजी पुढे सांगतात की, “तुमच्या शरीराने कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी पुरेशी झोप घेतो. त्याउलट न झोपता देखील मी बराच वेळ काम करू शकतो. तसंच मी अन्नाशिवाय देखील काही दिवस राहू शकतो.”

insert-2 (4)

डॉ. सावजी यांच्या सांगण्यानुसार, आपल्या जगण्याला उद्देश असणं आवश्यक आहे. यामुळे त्या व्यक्तीला जगण्याची प्रेरणा आणि फीट राहण्यास देखील मदत मिळते. “आपल्या जगण्याचा उद्देश शोधून काढणं गरजेचं आहे. वयाच्या १०० वर्षापर्यंत समाजासाठी कार्यरत राहाणं हा माझ्या जगण्याचा उद्देश आहे. मी दररोज नवनवीन लोकांना भेटतो त्यामुळे मी दररोज काहीतरी नवीन शिकतो.” असं डॉ. सावजी म्हणाले.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter