स्वाईन फ्लूवर मात करत ‘ती’नं दिला मुलीला जन्म

गर्भवती महिलांना स्वाईन फ्लूचा धोका जास्त असतो. मात्र पुण्यातील ३२ वर्षीय महिलेने स्वाईन फ्लूवर मात करत एका मुलीला जन्म दिलाय.

0
87
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

महाराष्ट्रात स्वाईन फ्लूची साथ अजूनही आहे. स्वाईन फ्लूचा गर्भवती महिलांना जास्त प्रमाणात धोका असतो. मात्र पुण्यातील ३२ वर्षीय महिलेने स्वाईन फ्लूवर मात करत एका मुलीला जन्म दिलाय. पुण्याच्या वानवरी भागातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये या महिलेची प्रसूती करण्यात आली.

३२ वर्षीय शिल्पा निंबाळकर या आठ महिन्यांच्या गरोदर असताना त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांना ताप आणि घसा खवखवणे या तक्रारी होत्या. रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्या बेशुद्ध झाल्या आणि त्यावेळी त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं. तपासणी केल्यानंतर त्यांना स्वाईन फ्लू असल्याचं निदान झालं.

शिल्पा जवळपास १२ दिवस व्हेंटिलेटवर होत्या. मात्र इतक्या समस्यांना तोंड देऊनही शिल्पा यांनी ८ मे रोजी एका मुलीला जन्म दिला. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, त्यावेळी आई आणि बाळाची तब्येत उत्तम होती.

शिल्पा निंबाळकर
शिल्पा निंबाळकर

याविषयी शिल्पा निंबाळकर सांगतात की, “जेव्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा मला स्वाईन फ्लू झालाय याचा काहीच अंदाज नव्हता. शिवाय तपासण्या करण्याअगोदरच मी बेशुद्ध झाली. आणि त्यानंतरच्या १२ दिवसांमधल्या कुठल्याचं घडामोडी मला आठवत नाही.”

शिल्पा पुढे सांगतात की, बेशुद्ध होताना मला खूप थकल्यासारखं आणि अशक्त वाटतं होतं. मात्र, तरीही माझ्या बाळाला पाहण्याची माझी इच्छा होती. अशा परिस्थितीमध्ये माझ्या कुटुंबीयांनी आणि डॉक्टरांनी मला फार मदत केली.”

रूबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, शिल्पाला जेव्हा रूग्णालयात आणलं तेव्हा तिची प्रकृती फार गंभीर होती. रूबी हॉलच्या अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. शिल्पा कुलकर्णी म्हणाल्या की, “ती जेव्हा रूग्णालयात आली तेव्हा तिच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी फार कमी होती. त्यामुळे तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं. अशा प्रकरणांमध्ये रूग्णाचा रक्तदाब नियंत्रणात ठेवणं हे फार आव्हानात्मक असतं.”

डॉ. कुलकर्णी पुढे सांगतात की, “अशा परिस्थितीतमध्ये आम्ही नेहमी आईच्या जीवाला प्राधान्य देतो. पणं आम्ही फार खूश आहोत की, या प्रकरणामध्ये आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.

पुण्याच्या जहांगिर रूग्णालयाच्या आत्पकालीन विभागाच्या प्रमुख डॉ. सय्यद पाशा सांगतात की, “अशी प्रकरणं फार दुर्मिळ असतात. त्यामुळे अशा रूग्णांना तातडीने रूग्णालयात दाखल करावं. अशा रूग्णाला श्वसनासंबंधी कोणतीही समस्या येऊ नये, याची दखल घेणं अत्यंत गरजेचं असतं.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter