महिलेच्या तोंडातील गाठीवर ससूनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

विजया खोत यांच्या तोंडात टॉन्सिल्सजवळ मोठी गाठ होती. या गाठीच्या बाजूला मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या होत्या. त्यामुळे कोणत्याच खाजगी रुग्णालयाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली नाही. शेवटी ससून रुग्णालयात त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

सरकारी रुग्णालयांमध्ये चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत. डॉक्टर चांगले उपचार करत नाहीत असं आपण सर्रास म्हणतो. पण, पुण्यातील विजया खोत यांना विचाराल, तर त्यांच्याकडून सरकारी रुग्णालयाचा वेगळा अनुभव ऐकायला मिळेल.

विजया खोत, यांच्या तोंडात टॉन्सिलजवळ एक मोठी गाठ होती. विजया, पुण्यातील काही खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी गेल्या. पण, या रुग्णालयांनी शस्त्रक्रिया जोखमीची आहे असं सांगत, उपचारांसाठी नकार दिला. त्यानंतर, विजया ससून रुग्णालयात आल्या. ससूनच्या डॉक्टारांनी विजया यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचं फक्त आव्हान स्वीकारलं नाही, तर योग्य पद्धतीने शस्त्रक्रियाही केली.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विजया यांच्या तोंडातील गाठीच्या आजूबाजूला मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहीनी होती. त्यामुळे ही शस्त्रक्रिया जोखमीची होती.

विजया खोत यांच्यावर केलेल्या शस्त्रक्रियेबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना ससून रुग्णालयाच्या नाक-कान-घसा विभागाचे प्रमुख डॉ. समीर जोशी म्हणतात, “गाठ अशा ठिकाणी होती की ही शस्त्रक्रिया जोखमीची होती. माझ्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत मी अशा प्रकारच्या फक्त तीन किंवा चार शस्त्रक्रिया केल्या आहेत. पण, यांच्यातली ही सर्वात कठिण शस्त्रक्रिया होती.”

विजया खोत
विजया खोत

डॉ. जोशी पुढे म्हणतात, “दोन आठवड्यांपूर्वी ससून रुग्णालयात विजया खोत यांच्यावर ही शस्त्रक्रिया झाली. रक्तवाहिन्या या गाठीच्या आजूबाजूला होत्या. त्यामुळे रक्तवाहिनीला धक्का न लावता, ही शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. रक्तवाहिनीला शस्त्रक्रियेदरम्यान धक्का लागला असता तर, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असता. रुग्णाचा जीव जाण्याची शक्यताही होती.”

शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या माहितीनुसार, विजया खोत यांच्या तोंडातील ट्युमर खूप मोठा होता. हा ट्युमर काढताना, रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास होणाऱ्या रक्तस्रावामुळे चेहऱ्याला दुखापत झाली असती.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना विजया खोत म्हणतात, “गेल्या सहा महिन्यांपासून मला हा त्रास होत होता. जेवताना किंवा बोलताना खूप दुखायचं. मी पुणे आणि कोल्हापुरातील अनेक खाजगी डॉक्टरांना दाखवलं. पण, ही शस्त्रक्रिया जोखमीची आहे असं सांगतं कोणीच माझ्यावर उपचार केले नाहीत. मी, ससूनच्या डॉक्टरांची आभारी आहे, त्यांनी मला दुसरं जीवन दिलं.”

विजया खोत यांच्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेत डॉ. राहुल तेलंग, डॉ. राहुल ठाकूर आणि डॉ. पूजा नागरेंनी मदत केली.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)