पुणे-डॉक्टरांनी वाचवलं महिलेचं गर्भाशय

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी एका 25 वर्षीय महिलेचं गर्भाशय वाचवलंय. गर्भाशयाच्या रक्तवाहिनीत डॉक्टरांनी एक लहान फुगा सोडला. ज्यामुळे महिलेच्या गर्भाशयातून होणारा रक्तस्राव थांबण्यास मदत झाली. ससून रुग्णालयात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाने उपचार करण्यात आलेत.

0
641
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

गर्भाशय म्हणजे महिलेच्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग. गर्भाशय नसेल तर ती महिला आई होऊ शकत नाही, त्या महिलेला मातृत्वाचं सुख कधीच मिळू शकत नाही. याचाच विचार करून पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी एका 25 वर्षीय महिलेचं गर्भाशय वाचवलंय.

अत्यंत गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया करण्याचं आव्हान डॉक्टरांनी लिलया पेललं. गर्भाशयातील रक्तवाहिनीत एक फुगा सोडून, डॉक्टरांनी रक्तस्राव बंद केला. ज्यामुळे या महिलेचं गर्भाशय वाचवण्यात यश आलं.

याबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना ससून रुग्णालयाचे डॉ. इब्राहीम अन्सारी म्हणाले, “प्लॅसेंटाला जर इजा झाली असेल तर, मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत महिलेचं गर्भाशय काढून टाकलं जातं. पण, अॅन्जिओप्लॅस्टि बलूच्या मदतीने आम्हाला फक्त रक्तस्राव थांबवण्यात यश आलं नाही तर, आम्ही महिलेचं गर्भाशयही वाचवू शकलो.”

डॉक्टरांच्या माहितीप्रमाणे ही नवी पद्धत वापरून पहिल्यांदाच ससून रुग्णालयात रुग्णावर उपचार करण्यात आलेत.

याबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना ससून रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाचे प्राध्यापक डॉ. संजयकुमार तांबे म्हणाले, “ही खूप दुर्मिळ पद्धत आहे. ससून रुग्णालयात ही नवीन पद्धत वापरून पहिल्यांदाच उपचार करण्यात आलेत.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter