स्वाईन फ्लूमुळे पुण्यात सगळ्यात जास्त मृत्यू

स्वाईन फ्लूमुळे पुणे जिल्ह्यात राज्यातून सगळ्यात जास्त मृत्यू झाल्याचं समोर आलंय. पुण्यात आतापर्यंत ९७ स्वाईन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

0
242
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

राज्यात स्वाईन फ्लूचं थैमान सुरुच आहे. स्वाईन फ्लूमुळे पुणे जिल्ह्यात, राज्यातून सगळ्यात जास्त मृत्यू झाल्याचं समोर आलंय. जानेवारी २०१७ पासून २६ ऑगस्टपर्यंत पुण्यात ९७ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. तसंच, यावर्षी आत्तापर्यंत ५०१ स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. १३ हजार लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली असल्याचा संशय प्रशासनानं व्यक्त केलाय. या रुग्णांना टॅमी-फ्लूचा डोस देण्यात आलाय.

पुण्यासोबत महाराष्ट्रातही स्वाईन फ्लूचा विळखा कायम आहे. राज्यभरात यावर्षी आतापर्यंत १४ लाख २६ हजार रुग्णांची स्वाईन फ्लूसाठी तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ४,४२८ रुग्णांना स्वाईन फ्लू असल्याची नोंद झाली असून राज्यभरात ४६१ मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुण्यानंतर स्वाईन फ्लूने झालेल्या मृत्यूंमध्ये नाशिक (४४), ठाणे (३१) आणि मुंबईचा (१८) क्रमांक लागतो.

डॉ. एम डीग्गीकर, संयुक्त संचालक आरोग्य सेवा पुणे यांनी सांगितलं की, “स्वाईन फ्लूचं लवकर निदान होणं गरजेचं आहे. हाच स्वाईन फ्लूच्या साथीला रोखण्याचा उपाय आहे.”

पुण्यातील जहांगिर हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. सय्यद पाशा यांनी सांगितलं की, “पुण्यातील बहुतांश आपत्कालीन विभागांमध्ये येणाऱ्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतेच आहे. लवकर निदान होण्यासाठी रुग्णांनी कूठलाही फ्लू हा स्वाईन फ्लू असू शकतो हे लक्षात ठेवायला हवं. एक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम झाल्यावर दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. स्वाईन फ्लू मधील ही शेवटची स्टेज असते.”

दरम्यान, दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात प्रोन व्हेंटिलेटशन नावाची एक अनोखी पद्धत वापरण्यात आली होती. ज्यामुळे स्वाईन फ्लूच्या ३ रुग्णांचे प्राण वाचले. यामध्ये व्हेंटिलेटर असलेल्या रुग्णाला पोटावर झोपण्यास सांगण्यात आलं होतं. पुण्यातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातल्या कुठल्याही रुग्णालयात अशाप्रकारची पद्धत वापरली जात नाही.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter