आदिवासी जिल्ह्यात न्यूमोनिया लसीसाठी निधी उपलब्ध करा- मुख्यमंत्री

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पाच आदिवासी जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार मुलांना न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरणासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात आरोग्य विभागाचा आढावा घेतला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.

आरोग्य विभागाच्या सुरु असलेल्या योजनांना अधिकचा निधी देताना आरोग्य संस्थांची बांधकामं मुदतीत पूर्ण करण्याकरता निधीची कमतरता जाणवू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे जनतेला दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल झाले पाहिजेत, असंही ते म्हणाले.

सादरीकरणादरम्यान प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास यांनी सांगितलं की, आदिवासी भागात ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो अशा ठिकाणची मुलं न्यूमोनिया होऊन दगावण्याची शक्यता जास्त असते. आणि या बालकांना लसीकरणाची आवश्यकता असते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी बैठकीतच पालघर, नंदुरबार, अमरावती, नाशिक आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांतील मुलांना न्यूमोनिया प्रतिबंधक लस देण्याकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे निर्देश दिले. त्यामुळे या पाच जिल्ह्यातील तपासणी केलेल्या सुमारे 1 लाख 40 हजार मुलांना लस दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “पायाभूत सुविधांसाठी ज्या प्रकारे प्राधान्याने निधी दिला जातो, तशाच प्रकारे आरोग्यासाठीही निधी देणार. आदिवासी भागात सेवा बजावणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी दर्जेदार अशी निवास व मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिली पाहिजे. आदिवासी भागात नियुक्ती केलेल्या डॉक्टरांच्या नियुक्तीच्या आदेशामध्ये बदलीच्या दिनांकाचाही उल्लेख करावा.”

ज्या आरोग्य संस्थांचे बांधकाम सुरु आहे त्यांना लागणारा आणि आरोग्य योजनांसाठी लागणारा निधी, नव्या योजनांसाठीचा निधी असे नियोजन करुन त्याचा आराखडा करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

ग्रामीण भागात आरोग्य सेवेसाठी काम करणाऱ्या आशा कार्यकर्ते या ग्रामीण आरोग्याचा कणा आहेत. ज्या आरोग्य संस्थांमध्ये डायलिसिसकरिता रुग्णांची प्रतिक्षा यादी मोठी आहे तिथे तिसरी शिफ्ट सुरु करावी. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आरोग्यकेंद्रांमध्ये मुलभूत सुविधा उभारण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter