ग्रामीण भागातील पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सरचा धोका

कॅन्सर नोंदणी केंद्रामधून समोर आलेल्या माहितीनूसार, १ लाख कॅन्सर रुग्णांमध्ये २० टक्के प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण असतात. यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

भारतामध्ये कॅन्सर रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होतेच आहे. देशातील विविध कॅन्सर नोंदणी केंद्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. यानुसार २०२० पर्यंत प्रोस्टेट कॅन्सर रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा अंदाजही तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमधील कॅन्सर नोंदणी केंद्रामधून समोर आलेल्या माहितीनुसार, १ लाख कॅन्सर रुग्णांमध्ये २० टक्के प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण असतात. यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. या कॅन्सरचा शरीरातील इतर ठिकाणीही फैलाव होतो आहे. लोकसंख्येनुसार उभारण्यात आलेल्या इतर कॅन्सर नोंदणी केंद्रांमधूनही अशाच प्रकारची माहिती पुढे आली आहे.

यामुळे ग्रामीण भागात यासंबंधी जास्त जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. याचसोबत या प्रोस्टेट कॅन्सरमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी उपचारांच्या अद्यावत सुविधा पुरवणंही आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय.

यासंबंधी बोलताना वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि सफदरजंग रुग्णालयातील युरोलॉजी आणि रेनल प्रत्यारोपण केंद्राचे प्रमुख डॉ. अनुप कुमार यांनी सांगितलं की, “सरकारी रुग्णालयांतील सेवांची गुणवत्ता वाढवण्याची गरज आहे. तसंच, सध्या उपचारांचा खर्च ३-४ लाख रुपये येतो. हा खर्च सामान्यांना परवडेल एवढा कमी करणं गरजेचं आहे. तसंच ग्रामीण भागात यासंबंधी जागृती करणंही गरजेचं आहे.”

एम्स रुग्णालयातील युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. पी. एन. डोग्रा म्हणाले की, “ग्रामीण प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. त्या भागात अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांच्या सुविधा उपलब्ध नसतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत या सोयी पुरवण्याचं आव्हान सरकार समोर आहे. तसंच, डॉक्टरांनीही रुग्णांना हा कॅन्सर कशामुळे होतो हे सांगणं गरजेचं आहे.”

जगभरात कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या कारणांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर सहाव्या क्रमांकावर आहे. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार २०३० पर्यंत जगात १७ लाख प्रोस्टेट कॅन्सरचे नवे रुग्ण असतील तर जवळपास ५ लाख मृत्यू यामुळे होतील.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)