धर्मादाय रुग्णालयाचे डॉक्टर करणार कैद्यांची वैद्यकीय तपासणी

राज्यभरातील जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या किंवा जेलमध्ये असलेल्या आरोपींची धर्मादाय रुग्णालयातील डॉक्टर वैद्यकीय तपासणी करणार आहेत. धर्मादाय रुग्णालयांद्वारे तुरुंगाच्या आवारात वैद्यकीय शिबीरं भरवण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. राज्यभरातील ४०० आणि मुंबईतील ७४ रुग्णालयातील डॉक्टर यात सहभाग घेतील

0
158
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • राज्यातील सर्व मध्यवर्ती तुरुंगातील कैद्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय
  • कैद्यांच्या प्रकृतीची चाचणी व्हावी या उद्देशानं निर्णय घेण्यात आला
  • नागपूर व चंदपूरमधील तुरुंगातील कैद्यांची वैद्यकीय तपासणी झाली
  • तुरुंगाच्या आवारातच प्राथमिक बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करणार
  • कैद्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी धर्मादाय रुग्णालयांचा पुढाकार

राज्यातील विविध जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची वैद्यकीय तपासणी धर्मादाय रुग्णालयातील डॉक्टर करणार आहेत. यामुळे कैद्यांना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत वैद्यकीय उपचार आणि सल्ला मिळू शकणार आहे.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सांगितलं की, ‘‘प्रत्येक जिल्ह्यातील तुरुंग प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. नागपूर आणि चंद्रपूरच्या तुरुंगातील कैद्यांची तपासणी करण्यात आलीये. मुंबईच्या तुरुंग अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. लवकरच त्यांच्याकडूनही परवानगी मिळेल.”

‘‘तुरुंग प्रशासनाच्या परवानगीनंतर धर्मादाय रुग्णालयातील डॉक्टर तुरुंगाच्या आवारातच प्राथमिक बाह्यरुग्ण विभाग सुरू करतील. याठिकाणी कैद्यांची तपासणी केली जाईल’’, असंही डिगे यांनी पुढे म्हंटलं.

सध्या महाराष्ट्रात ५४ जेल असून यात तीस हजार कैदी शिक्षा भोगतायेत.

धर्मादाय आयुक्त पुढे बोलताना म्हणाले की, ‘‘तुरूंगातील कैद्यांना वैद्यकीय सेवा देण्याबाबत आम्ही धर्मादाय रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानुसार महाराष्ट्रातील ४०० खासगी रुग्णालयं आणि मुंबईतील नानावटी, लिलावती, जसलोक आणि हिंदुजा अशी साधारणतः ७४ रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टर यात सहभागी होतील. या शिबिराला सुरूवात झाली असून मुंबईतील तुरुंगात येत्या १५ दिवसात हे शिबिर भरवलं जाईल’’.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter