बीड- वय 38…11 मुलांची आई, 20व्यांदा बाळंत…

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात एक महिला 20व्या वेळेला बाळंत होणार आहे. यापूर्वी 19 वेळा ही महिला गरोदर राहिली होती. तर तीन वेळा या महिलेचा गर्भपात झाला आहे. मात्र 20 वेळा गर्भधारणा होणं हे योग्य नसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात एक महिला 20व्या वेळेला बाळंत होणार आहे. हे वाक्य वाचून नक्कीच तुमचे डोळे विस्फारले असतील. या बातमीने समस्त महाराष्ट्राला अचंबित केलं आहे. मात्र या बातमीनंतर 20 वेळा गर्भधारणा होणं कितपत योग्य हा प्रश्न समोर येतोय.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, एखाद्या महिला 20 वेळा बाळंत होणं योग्य नाही. यामुळे अनेक महिलेच्या शारीरिक आरोग्यासंबंधी अनेक गुंतागुंती होऊ शकतात. अशा परिस्थितीत प्रसूतीवेळी महिला दगावण्याची शक्यताही असते.

राज्यातील बीड जिल्ह्यातील 38 वर्षीय लंकाबाई खरात गरोदर असून तिचं हे बाळंतपण 20वं आहे. ही महिला यापूर्वी 19 वेळा गरोदर राहिली होती आणि आता ही महिला सात महिन्यांची गरोदर आहे. लंकाबाई यांच्या 16 प्रसूती यशस्वी झाल्या असून 5 वेळा जन्मानंतर काही तासांत बालकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन वेळा या महिलेचा गर्भपात झाला आहे.

बीड जिल्हा रूग्णालयाचे सिविल सर्जन डॉ. अशोक थोरात माय मेडिकल मंत्राशी बोलताना म्हणाले, “या महिलेची 11 मुलं आहेत आणि आता वयाच्या 38व्या वर्षी ती 20व्यांदा आई बनणार आहे. या महिलेची पहिल्यांदाच रुग्णालयात प्रसूती होणार आहे. यापूर्वी महिलेने सर्व मुलांना आपल्या घरीच जन्म दिला होता. या महिलेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आम्ही तिला रुग्णालयात दाखल केलं होतं. या महिलेच्या काही तपासण्या केल्या. त्यानंतर समुपदेशन आणि उपचार देऊन तिला सध्या घरी सोडण्यात आलं आहे.”

माय मेडिकल मंत्राशी बोलताना सर जे.जे समूह रूग्णालयाच्या स्त्रिरोग विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. अशोक आनंद म्हणाले, “इतक्या गर्भधारणांचा परिणाम महिलांच्या तब्येतीवर होऊ शकतो. यामुळे महिलांमध्ये कुपोषणाची आणि अॅनिमिया होण्याची समस्या निर्माण होते. पोषणाच्या अभावामुळे रक्तदाब वाढू शकतो. सतत प्रसूतीमुळे गर्भाशय खाली येतं आणि काही प्रकरणात काढून टाकावं लागतं. प्रसूतीनंतर रक्तस्राव जास्त झाल्याने महिला दगावण्याची शक्यताही असते. तर जन्माला येणारं बाळ कमी वजनाचं असू शकतं.”

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना जळगावमधील स्त्रिरोगतज्ज्ञ डॉ. विलास भोळे म्हणाले, “20व्या वेळी गर्भवती राहणाऱ्या महिलेला पहिल्या दिवसापासूनच धोका असतो. यावेळी फार गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. केवळ गर्भवती महिलाच नाही तर बाळाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. महिलांना गरोदरपणात मधुमेह, कमी दिवसांत प्रसूत होणं, प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव होणं, गर्भाशयाच्या समस्या”तर गर्भाशय काढून टाकण्याच्या समस्याही येऊ शकते.”

डॉ. विलास पुढे म्हणाले, “बाळाच्या आरोग्यावरही याचा परिणाम होत असून बाळाची वाढ खुंटते. याशिवाय बाळाचा योग्यरित्याने विकास होत नाही. त्यामुळे इतक्या वेळी गर्भधारणा महिलांसाठी योग्य नाही.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter