‘टीबी’ मोहिमेकडे जातीने लक्ष द्या, मोदींची फडणवीसांना सूचना

देशातील आरोग्य व्यवस्थेसमोर ‘टीबी’चं मोठं आव्हान उभं राहिलंय. संसर्गजन्य आजारांमध्ये ‘टीबी’ सर्वात जास्त लोकांचे बळी घेतोय. दरवर्षी २९ लाख नवीन ‘टीबी’ रूग्ण आढळून येतात. तर, ४ लाख २० हजार लोकांचा टीबीमुळे मृत्यू होतो असं पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात नमुद केलंय. त्यामुळे दर तीन महिन्यांनी टीबीच्या मोहिमेची माहिती घ्या, अशी सूचना पंतप्रधानांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीसांना केलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

केंद्र सरकारने देशातून टीबीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी २०२५चं लक्ष ठेवलंय. पण, देशात टीबीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. त्यातच, औषधांना दाद न देणाऱ्या टीबी रुग्णांची संख्याही वाढू लागलीये. त्यामुळे टीबीचं समूळ उच्चाटन केंद्र सरकार आणि आरोग्य व्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान म्हणून उभं राहिलंय.

टीबीची वाढती समस्या लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहीलंय. ज्या पत्रात त्यांनी देशातील टीबीच्या वाढत्या समस्येमुळे दरवर्षी २० हजार कोटी रूपयांचा आर्थिक नुकसान होत असल्याचं म्हटलंय.

b7ca48bc-29ff-4249-b7d8-a937cc0d1583

पंतप्रधान आपल्या पत्रात म्हणतात,

 • टीबी मोहिमेकडे जातीने लक्ष द्या
 • दर तीन महिन्यांनी मोहिमेची माहिती घ्या
 • योग्य अंमलबजावणीवर लक्ष द्या
 • टीबीची प्रकरणं आणि उपचारांबाबत माहिती घ्या
 • टीबीवर उपचार असताना लोकांचे मृत्यू होणं योग्य नाही

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पंतप्रधानांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय राज्य सरकारला आर्थिक आणि तंत्रज्ञानासाठी सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन दिलंय.

टीबी आणि भारत

 • भारतात दरवर्षी ४ लाखांहून जास्त रुग्णांचा मृत्यू
 • जगातील टीबी रुग्णांपैकी ६४ टक्के भारतात
 • एकापेक्षा जास्त औषधांना दाद न देणारे दरवर्षी १ लाख ३० हजार रूग्ण
 • साल २०१६मध्ये नवीन प्रकरणांपैकी ६ टक्के लहान मुलं
 • ८१ टक्के रुग्ण सरकारी रुग्णालयातून
 • महाराष्ट्रात ३० टक्क्यांपेक्षा जास्त खाजगी रुग्णालयातून रुग्णांची नोंद

जगभरात दरवर्षी जवळपास १० दशलक्ष नवीन टीबीचे रुग्ण आढळून येतात. यातील खूप मोठी संख्या भारताची आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही टीबीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारने टीबी मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली पाहिजे अशी सूचना केली होती.

याविषयी सरकारच्या शिवडी टीबी रूग्णालयातील टीबी तज्ज्ञ डॉ. विकास ओस्वाल यांच्या सांगण्यानुसार, “टीबी निर्मूलन कऱण्याचं स्वप्न फक्त स्वप्नचं राहताना दिसतंय. टीबी निर्मूलनासाठी प्रत्येक भागात टीबीचे किती रूग्ण आहेत याची माहिती घेणं गरजेचं आहे. मुंबईतील गोवंडी भागात टीबीचे सर्वात जास्त रूग्ण आहेत. याठिकाणीच औषधांना दाद न देणारा टीबी मोठ्या प्रमाणावर पसरतोय. या परिसरात २०० स्केअर फूटाच्या घरात हवा खेळती राहण्यसाठी जागा नसताना लोकं राहतायत. साधारणतः प्रत्येक घरात आठ जणं राहतात. ज्यामध्ये प्रत्येक घरात दोन टीबीचे रूग्ण आहेत.”

याविषयी राज्याच्या टीबी विभागाचे संयुक्त संचालक डॉ. संजीव कांबळे यांच्या सांगण्यानुसार, “खाजगी रूग्णालयात जाऊन देखील आम्ही रूग्णांची तपासणी कऱण्याचा प्रयत्न करतो. कोणताही रूग्ण तपासणी शिवाय राहणार नाही याची आम्ही खात्री करू. त्यासोबत दर महिन्याला आम्ही यासंदर्भात पडताळणी करतो. पत्रात नमूद केलेले बदल आम्ही विचारात घेऊ.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter