2 महिन्यांपूर्वी बच्चू जखमी अवस्थेत आढळला होता…त्याला उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती…डहाणूच्या सुश्रूषा केंद्रात त्याच्यावर फिजीयोथेरेपीद्वारे उपचार करण्यात आले…आणि आता उपचारांनंतर तो पुन्हा चार पायावर चालू लागलाय..
आता तुम्हाला प्रश्न पडेल चार पाय म्हणजे आम्ही नेमकं कोणाबद्दल तुम्हाला सांगतोय…तर हे उपचार केलेत बच्चू नावाच्या एका कासवावर…वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल पण डहाणूतील इंजर्ड सी टर्टल ट्रीटमेंट अँड वाईल्डलाईफ ट्रान्झिट सेंटरमध्ये ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवावर फिजीयोथेरेपीने उपचार करण्यात आलेत.
यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना या सेंटरचे पशुवैद्य डॉ. दिनेश विन्हेळकर म्हणाले, “दोन महिन्यांपूर्वी वसईमध्ये जखमी अवस्थेत हे कासव आमच्याकडे आणण्यात आलं. ज्यावेळी हे कासव आमच्याकडे आलं त्यावेळी ते खूप अशक्त होतं शिवाय त्याच्या पुढच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याने त्या पायाची हालचाल होत नव्हती. त्यामुळे त्या कासवाला पाण्यात पोहणं किंवा चालता येणं शक्य नव्हतं. त्यावेळी मग आम्ही या कासवावर फिजीयोथेरेेपीद्वारे उपचार करण्याचा निर्णय घेतला.”
डॉ. दिनेश पुढे म्हणाले, “ज्यावेळी आम्ही त्या कासवाची संपूर्णपणे तपासणी केली त्यावेळी आम्हाला समजलं की त्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं नव्हतं. ते फार अशक्त होतं आणि त्याला मसल इन्जुरी झाली होती. त्यानंतर त्याचे मसल्स योग्य पद्धतीने कार्यरत व्हावे यासाठी आम्ही फिजीयोथेरेपीद्वारे उपचार केले. जेणेकरून त्याचे स्नायू बळकट होतील. आता त्याच्या पायाची स्थिती दररोज सुधारतेय. त्याचा पायात हलत असून त्याला पोहायलाही जमतंय. सध्या त्याला काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून 10-15 दिवसांत त्याला समुद्रात सोडण्यात येणारे. भारतात पहिल्यांदाच एका कासवावर फिजीयोथेरेपीद्वारे उपचार करण्यात आलेत.”
यासंदर्भात बोलताना पुण्यातील फिजीयोरेथेरेपीस्ट डॉ. मानसी पवार म्हणाल्या की, “जसं माणसांसाठी फिजीयोथेरेपी असते त्याचप्रमाणे प्राण्यांसाठी देखील असते. या फिजीयोथेरेपीच्या या उपचारांमुळे प्राण्यांचीही परिस्थिती सुधारण्यास मदत होते. फक्त यामध्ये एक समस्या असते ती म्हणजे प्राण्यांवर फिजीयोथेरेपीद्वारे उपचार करताना त्यांना नक्की काय होतंय आणि कुठे दुखतंय याचा अंदाज लावणं थोडं कठीण असतं.”