‘जास्त पाणी प्यायल्याने जिवाला धोका’

पाणी पिणं चांगलं, म्हणून आपण जास्तीत जास्त पाणी दिवसभरात पिण्याचा प्रयत्न करतो. पाणी प्यायल्याने शरीर निरोगी राहतं असं म्हणतात. पण पाण्याचा अतिरेकही चांगला नाही. जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमची मात्रा कमी होते. प्रसंगी जीवही जाऊ शकतो.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

गेली कित्येक दशकांपासून आपण हेच ऐकतं आलो, की पाणी पिणं शरीरासाठी किती चांगलं असतं. पाणी पिण्याचे फायदे काय आहेत. पण, या फायद्यांच्या नादात आपण गरज नसताना जास्त पाणी पिऊ लागलोय, ज्यामुळे आपल्या शरीराला त्रास होतोय.

कमी प्रमाणात मीठ, आणि जास्त प्रमाणात पाणी, याचा लोकं वेगळा अर्थ काढतायत. जास्त पाणी पिणं शरीरासाठी घातक आहे. जास्त पाणी प्यायल्याने ‘हायपोनाट्रामिया’ हा आजार होण्याची शक्यता असते. जास्त पाणी प्यायल्यामुळे शरीरातील सोडियम पाण्यात विरघळून जातं. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला फिट येऊ शकतात, तो कोमात जाऊ शकतो, किंवा प्रसंगी त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. अशीच काहीशी परिस्थिती ४० वर्षीय रीना (नाव बदललेलं) यांची होती.

एक दिवशी अचानक रीनाला डोकेदुखीचा त्रास होऊ लागला, चक्कर येऊ लागली आणि डोळ्यासमोर अंधार येऊ लागला. तात्काळ रीनाला ग्रेनइगल्स ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. रीनाला कुठलाच आजार नव्हता, पण रुग्णालयात आल्यानंतर कोमात जाण्यासारखी तिची परिस्थिती होती.

डॉक्टरांनी तात्काळ तपासणी केली, तर लक्षात आलं की, रीनाच्या शरीरातील सोडियमची मात्र खूप कमी झालीये. ज्यामुळे ती कोणत्याही क्षणी कोमात जाऊ शकते, प्रसंगी तिचा मृत्यूदेखील होऊ शकतो. डॉक्टरांना, असं का झालं असावं हे कळलंच नाही. पण, जेव्हा रीनाबाबत त्यांना जास्त माहिती मिळाली तेव्हा रीनाच्या शरीरात सोडियम प्रचंड कमी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

डॉ. वज्रापू राजेंद्र अवेअर ग्लेनइगल्स ग्लोबल हॉस्पिटल
डॉ. वज्रापू राजेंद्र
अवेअर ग्लेनइगल्स ग्लोबल हॉस्पिटल

रीनाची ही परिस्थिती ड्रग्जच्या व्यसनामुळे नाही, दारू पिण्याच्या व्यसनामुळे नाही, तर डिटॉक्स डाएटमुळे झाली होती. जास्त मीठ नको, म्हणून रीना दिवसभरात ६ लीटर पाणी पित होती. टीव्हीवर पाहिलेल्या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे मीठाला पर्याय म्हणून लिंबूपाणी पित होती. सामान्य माणसाच्या शरीरात सोडियमचं प्रमाण जेवढं पाहिजे, त्यापेक्षा फार कमी सोडियमचं प्रमाण रीनाच्या शरीरात होतं. रीनाने याबाबत दुर्लक्ष केलं असतं तर तिला फिट येऊ लागल्या असत्या, आणि मेंदूला इजा झाली असती.

दर दिवशी ५-६ लीटर पाणी पिणं गरजेचं आहे यात काहीच तथ्य नाही. प्रत्येकाने आपला आहार योग्य प्रमाणात घ्यायला हवा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये.

अशा परिस्थितीत मी किती लीटर पाण्याचं सेवन केलं पाहिजे? सोडियमचं प्रमाण काय असावं? हे सगळे प्रश्न तुमच्या डोक्यात येतील. प्रत्येकाने आपल्या शरीराप्रमाणे पाण्याचं सेवन करावं. तुमच्या लघवीचा रंग तुम्ही किती पाणी पिणं गरजेचं आहे हे सांगण्यासाठी योग्य आहे.

सामान्यत: प्रत्येक माणसाला २३०० मिलीग्रॅम सोडियमची दिवसभरात आवश्यकता असते. पण, समजा तुम्ही ५१ वर्षांचे आहात, आणि तुम्हाला मधुमेह किंवा रक्तदाब यांसारखे आजार आहेत तर तुम्ही दिवसाला फक्त १५०० मिलीग्रॅम सोडियमचे सेवन करावं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter