पतीचे अवयवदान करून वाचवले चौघांचे प्राण

पतीची आणि आपली साथ सुटली तरी, पतीचे अवयव इतरांचे प्राण वाचवू शकतात, त्यांचे जीवन आनंदित होऊ शकते, हाच विचार करून पत्नीने केले पतीच्या अवयवांचे दान. एकाचे अवयवदान म्हणजे आठ जणांना जीवनदान!!

0
146
तिने पतीचे अवयवदान करून वाचवले चौघांचे प्राण
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात पतीला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर पत्नीने धैर्य दाखवले. जोडीदाराची साथ कायमची सुटणार हे माहीत असूनही, अवयव रुपात पती जिवंत राहतील, या भावनेतून एका पत्नीने पतीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेऊन चार रुग्णांचे प्राण वाचवले.

चिराबाजार परिसरात राहणाऱ्या ६१ वर्षीय गणपत मोहिते (नाव बदललेले) यांना अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतले. पण त्रास कमी न झाल्याने कुटुंबियांनी त्यांना ७ ऑगस्टला सैफी रुग्णालयात दाखल केले. गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, १२ ऑगस्टला पहाटे डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले.

आपल्या पतीची साथ कायमची सुटणार माहीत असूनही पत्नीने पतीच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. पतीच्या अवयवदानामुळे प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांना जीवनदान मिळू शकते, या विचारातूनच तिने अवयवदानास परवानगी दिली. यानुसार गणपत यांचे यकृत, दोन्ही मूत्रपिंड व डोळे दान करण्यात आले.

यासंदर्भात ‘माय मेडिकल मंत्रा’शी बोलताना सैफी रुग्णालयातील प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयक डॉ. शबिना खान म्हणाल्या की, “डोकेदुखीचा त्रास जाणवत असल्याने गणपत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. नातेवाईकांकडे अवयवदानाची परवानगी मागितली. यासाठी त्यांची समजूत घालण्यासाठी तब्बल १२ तास लागले. त्यानंतर मात्र, गणपत यांच्या पत्नीने अवयवदान करण्यास परवानगी दिली.”

“गणपत यांचे यकृत अपोलो रुग्णालयातील एका रुग्णाला दान करण्यात आलेय. तर, एक मूत्रपिंड फोर्टिस रुग्णालयात डायलिसीसवर असलेल्या २६ वर्षीय तरुणाला दान केले गेले. दुसरे मूत्रपिंड सैफी रुग्णालयातील एका रुग्णाला दान करण्यात आलेय. याशिवाय डोळेही दान केले आहेत.” अशी माहिती डॉ. शबिना यांनी दिली.

२०१५मध्ये मुंबईत ४२ वेळा अवयवदान करण्यात आले होते. यात ३७ यकृतं, ७२ मूत्रपिंडं व ५ हृदय दान केले गेले. या अवयवांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून गरजू रुग्णांना नवे आयुष्य मिळाले होते. तर, २०१६मध्ये अवयवदानात दुपटीने वाढ झाली होती. यंदाच्या वर्षी २०१७मध्ये मुंबईत आतापर्यंत ३३ वेळा अवयवदान झालंय. ४० मूत्रपिंडं, २९ यकृतं, २० हृदय आणि एका फुफ्फुसाचं दान करण्यात आलंय. यावरून गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू असलेली अवयवदानाविषयची जागरूकता कायम असल्याचे दिसून येतंय.

अद्यापही काहीजण अवयवांच्या प्रतीक्षेत :

अवयवदानासंदर्भात सरकारतर्फे विविध स्तरावर होत असलेल्या जनजागृतीमुळे अवयवदान करण्यासाठी लोक स्वतःहून पुढाकार घेऊ लागलेत. मात्र, अवयवांच्या वाढत्या प्रतीक्षा यादीच्या तुलनेत दात्यांची संख्या अपुरीच पडतेय.

“जानेवारी २०१७ ते आतापर्यंत मुंबईत ३२३८ रुग्ण मूत्रपिंडांसाठी प्रतीक्षा यादीवर आहेत. यकृतासाठी २४० रुग्ण प्रतीक्षेत असून, ३४ जणांना हृदय पाहिजे आहे. तर फुफ्फुसासाठी १० रुग्ण गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करताहेत,” अशी माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वयक समितीद्वारे (झेडटीसीसी) मिळाली आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter