खुशखबर! निवासी गर्भवती डॉक्टरांना भरपगारी सुट्टी

निवासी डॉक्टरांना प्रसूती आणि टीबी झाल्यास भरपगारी रजा मिळणार आहे. निवासी डॉक्टरांच्या या मागणीला अखेर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाने मान्यता दिलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

निवासी डॉक्टरांना प्रसूती आणि टीबी झाल्यास भरपगारी रजा मिळावी ही मागणी गेली अनेक वर्ष राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून केली जात होती. अखेर निवासी डॉक्टरांच्या या मागणीला वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाने मान्यता दिलीये.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयासोबत यासंदर्भात निवासी डॉक्टरांनी बैठक घेतली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. याअगोदर निवासी डॉक्टरांना टीबी झाल्यास किंवा महिला निवासी डॉक्टरांना प्रसूती झाल्यास भरपगारी रजा मंजूर होत नव्हती.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाचे सहसंचालक प्रकाश वाकोडे माय मेडिकल मंत्राशी बोलताना म्हणाले, “महिला निवासी डॉक्टरांसाठी प्रसूती रजा आणि टीबीसाठी भरपगारी रजा मंजूर केलीये. परंतु महिला डॉक्टर प्रसूती रजेवर गेल्यानंतर त्याजागी बदली काम करणाऱ्या निवासी डॉक्टरला मानधन देण्याबाबतचा प्रस्ताव येत्या दोन दिवसांत राज्य सरकारला पाठण्यात येणारे.”

केंद्रीय मार्ड अध्यक्ष डॉ. लोकेशकुमार चिरवटकर म्हणाले, “निवासी डॉक्टरांना क्षयरोगाची लागण झाल्यास भरपगारी रजा द्यावी, अशी अनेक वर्षांपासून आम्ही मागणी करत होतो. याशिवाय महिला निवासी डॉक्टरांना प्रसूती रजा मिळावी ही सुद्धा मागणी होती. यासाठी अनेकदा संपही पुकारले. पण आता वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयानं मार्डची बैठक बोलावून या दोन्ही मुद्द्यावर चर्चा करून भरपगारी रजा देण्याच्या मागणीला मंजुरी दिलीये.’’

पुण्यातील ससून रुग्णालयातील मार्ड संघटनेच्या महिला प्रतिनिधी डॉ. श्रद्धा ठाकूर यांनी सांगितलं की, ‘‘महिला निवासी डॉक्टरांना प्रसूती रजा मिळावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून मार्ड संघटना राज्य सरकारकडे करतंय. त्यानुसार आता वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डिएमईआर) यांनी महाराष्ट्रातील महिला निवासी डॉक्टरांना भरपगारी प्रसूती रजा मंजूर केलीये. याशिवाय टीबी झालेल्या डॉक्टरांनाही सुट्टीचा पगार देण्याचा निर्णय दिलाय. निवासी डॉक्टरांच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे या डॉक्टरांना टीबी होण्याचा धोका असतो. डिएमईआरने भरपगारी रजा मंजूर केल्याने आमच्या प्रयत्नांना यश मिळालंय. प्रसारमाध्यमांच्या सहकार्यांमुळेच हे साध्य होऊ शकलंय.”

निवासी महिला डॉक्टरांसाठीची प्रसूती तसंच टीबी झाल्यास देण्यात येणारी भरपगारी रजा सुरूवातीला वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या स्तरावर मान्य करण्यात येईल. या निर्णयाविषयीचं परिपत्रक लवकरच काढण्यात येणारे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter