‘हेल्दी महाराष्ट्र’ तिसऱ्या क्रमांकावर

नीती आयोगाने 'हेल्दी स्टेट, प्रोगेसिव्ह इंडिया' रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. पहिल्या ३ हेल्दी राज्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राने आरोग्य क्षेत्रात सुधारणा करत दहाव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी मजल मारली आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

देशातील हेल्दी राज्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. नीती आयोगाने दुसरा प्रोग्रेसिव्ह इंडिया रिपोर्ट जारी केला आहे, यामध्ये महाराष्ट्राने आरोग्य क्षेत्रात कमालीची कामगिरी करून दहाव्या स्थानावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. आरोग्यात सर्वाधिक सुधारणा करणाऱ्या ३ राज्यांच्या यादीत महाराष्ट्र आहे.

देशात आरोग्यात सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत केरळ सर्वात उच्च स्थानी, आंध्र प्रदेश दुसऱ्या आणि महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे. तर नीती आयोगाच्या गेल्या हेल्थ रिपोर्टच्या तुलनेत यंदाच्या हेल्थ रिपोर्टमध्ये हरयाणा, राजस्थान आणि झारखंड यांनी चांगली कामगिरी केल्याचं दिसून आलं आहे.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य क्षेत्रातील कामगिरीनुसार नीती आयोग हेल्दी स्टेट प्रोगेसिव्ह इंडिया हा रिपोर्ट तयार करतं. पहिला रिपोर्ट हा २०१४-१५ आणि २०१५-१६ या सालातील कामगिरीवर आधारित होता. तर दुसरा रिपोर्ट हा २०१६-१७ आणि २०१७-१८ या २ वर्षांवर आधारित आहे.

आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र सरकार राज्यांसोबत काम करत असल्याचं नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणालेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल म्हणाले, “प्रत्येक राज्याला देण्यात आलेल्या या आरोग्याच्या निर्देशांकामुळे राज्यांना त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील कामगिरीबाबत सहजरित्या मूल्यांकन करणं शक्य होतं. मागील वर्षाची कामगिरी पाहता येते, तसंच इतर राज्यांशी स्पर्धा करण्यास प्रोत्साहन मिळतं”

यावर महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “नीती आयोगाने जाहीर केलेल्या सर्वंकष आरोग्य निर्देशांकामध्ये महाराष्ट्राने संपूर्ण देशात तिसरा क्रमांक मिळवला आहे. ही निश्चितच आनंदाची बाब आहे. आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या कामगिरीचं हे यश आहे. आरोग्याच्या क्षेत्रात राज्य सरकारने वेळोवेळी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे राज्याचा गुणात्मक दर्जा वाढला असून भविष्यात देखील मातामृत्यू, बालमृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातायत. मेळघाटासारख्या दुर्गम भागातील बालमृत्यू रोखण्याकरता मेळघाट कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्यावर अंमलबजावणी सुरु आहे.”

तर केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान म्हणाल्या, “या आरोग्य निर्देशांकामुळे सरकारला कामगिरीचं मूल्यांकन करण्यास मदत होईल आणि राज्यांना ते नेमके आरोग्य क्षेत्रात कुठे आहेत, काय करत आहेत आणि पुढे नेमकं काय करायचं आहे, याची दिशा मिळेल.”

‘माय मेडिकल मंत्रा’शी बोलताना पुण्यातील जन आरोग्य संघटनेचे सदस्य डॉ. अभिजीत मोरे यांनी सांगितलं की, ‘‘सुदृढ राज्य म्हणून महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे ही नक्कीच आनंदाची बाब आहे. मात्र यावरच समाधान न मानता आरोग्य व्यवस्थेचा कणा आणखीन मजबूत कशा होईल याबाबत काम करायला हवं. महाराष्ट्र दरडोई उत्पन्न (जीडीपी)च्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. माता आणि बालमृत्यूंचं प्रमाणही राज्यात कमी झालं आहे. फक्त काही बाबतीत राज्य सरकारनं सुधारणा करणं गरजेचं आहे. डॉक्टर आणि परिचारिकांच्या रिक्त जागा तातडीनं भरायला हव्यात, सरकारी रुग्णालयात आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.’’

‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे माजी सचिव डॉ. पार्थवी संघवी म्हणाले की, ‘‘नीती आयोगानं कुठल्या धोरणाअंतर्गत महाराष्ट्र हेल्दी राज्य म्हणून निवडलं हे पाहावं लागेल. पण महाराष्ट्र आरोग्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असल्यानं आनंदच आहे. तरीदेखील सरकारी आणि पालिका रुग्णालयात आवश्यक सुविधा पुरवणं गरजेचं आहे. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होणं आवश्यक आहे. तर गरजू रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळू शकतील’’

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter