628 लोकांना जीवनदान देणारा ‘देवदूत’

अवयवदानाची संख्या वाढावी आणि समाजात त्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न केले जातात. देशभरात अवयवदान मोठ्या प्रमाणात व्हावं यासाठी सुरतमध्ये असणाऱ्या डोनेट लाईफचे अध्यक्ष निलेश

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

गुजरातच्या सुरतमध्ये जास्तीत जास्त घरातील लोकांना अवयवदानाविषयी माहिती आहे. या ठिकाणची लोकं अवयवदानासाठी आता स्वतः पुढाकार घेऊ लागलेत. याचं कारण म्हणजे सुरतमध्ये विविध स्तरांवर केली जाणारी जनजागृती.. आणि सुरतमध्ये ही जनजागृती पसरवण्याचं काम करतायत डोनेट लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष निलेश मंडलेवाला. 2005 सालापासून विविध पद्धतीने आणि विविध ठिकाणी ही संस्था अवयवदानाच्या जनजागृतीचं काम करतेय. या कामाबद्दल माय मेडिकल मंत्राने निलेश यांच्याशी चर्चा केलीये.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना निलेश म्हणाले की, “2005 पासून आम्ही अवयवदान जनजागृतीच्या कामाला सुरुवात केली. माझ्या वडिलांना किडनीची समस्या होती. त्यांना डायलेसिसला घेऊन रूग्णालयात गेल्यावर माझ्या लक्षात आलं किडनीचे आजार हे अनेकांना होतात. आणि एखाद्या रूग्णाला जर याचा त्रास असेल तर तो त्रास फक्त त्या रूग्णाचा नसून संपूर्ण कुटुंबाचा असतो. त्यामुळे या रूग्णांसाठी काहीतरी करावं, त्यांना नव्याने आयुष्य मिळावं याचा विचार केला. आणि त्यानंतर अवयवदानाच्या जनजागृतीच्या माझ्या कामाला सुरुवात झाली.”

Insert (26)

निलेश यांची संस्था विविध रूग्णालयात जाऊन ब्रेनडेड रूग्णांच्या नातेवाईकांचं समुपदेशन करते. निलेश म्हणाले की, “सुरुवातीला आम्ही रूग्णालयातील डॉक्टरांना ब्रेनडेड रूग्णांची माहिती देण्यास सांंगितलं होतं. त्यानुसार डॉक्टरांनी ब्रेनडेड रूग्णांची माहिती दिली. आधी किडनी मग लिव्हर आणि त्यानंतर हृदय दान अशाप्रकारे आम्ही अवयवदानाची जनजागृती करायला सुरुवात केली. या कार्यामुळे आतापर्यंत आम्ही तब्बल 628 लोकांना जीवनदान देण्यास यशस्वी झालोय.”

मुंबईत राहणाऱ्या आराध्या मुळेला हृदय मिळवून देण्यासाठी निलेश यांच्या संस्थेनं फार मदत केली होती. निलेश पुढे म्हणाले की, “अवयवदानाच्या जनजागृतीचं काम हे सुरुवातीच्या काळात फार अवघड होतं. कारण आम्हाला अशा व्यक्तीचं समुपदेशन करावं लागतं ज्या व्यक्तीला तुम्ही उभ्या आयुष्यात भेटलेलेे नसता. सुरुवातीला ज्यावेळी आम्ही या लोकांचं समुपदेेशन करायचो त्यावेळी लोकं आम्हाला समजून घ्यायचे नाहीत, उलट धमकवायचे किंवा अंगावर धावून यायचे. मात्र अशा परिस्थितीतही आम्ही मागे हटलो नाही आणि आमचं काम सुरूच ठेवलंय. मात्र आता परिस्थिती बदललीये. लोकं चांगला प्रतिसाद देतायत. त्यामुळे सुरतमधील लोकांचा अवयवदानाबाबतचा दृष्टिकोन बदललेला पाहायला मिळतोय.”

निलेश यांच्या मताप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीने अवयवदानाच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे त्यांची संस्था प्रत्येक व्यक्तीच्या मनात याबाबत जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न करतेय. “आम्ही काही दिवसांपूर्वी आनंद आणि खेडा भागात पोलीस आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. दरवर्षी आम्ही अवयवदान केलेल्या कुटुंबीयांचा सत्कार करतो. काही दिवसांपूर्वी अवयवदान केलेल्या काही कुटुंबीयांचा सत्कार आम्ही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते केला. यामुळे इतर लोकांना प्रेरणा मिळते आणि ते देेखील यासाठी पुढाकार घेतात.”

अवयवदानाची चळवळ ही देशभरात फार मोठी व्हायला पाहिजे. जर प्रत्येक ब्रेनडेड व्यक्तीचं अवयवदान झालं तर जिवंत व्यक्तींना अवयवदान करायची गरज भासणार नाही. अवयवदानाची जनजागृतीच्या कार्याची केवळ सुरुवात आहे, यासाठी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, असं मतंही निलेश यांनी व्यक्त केलंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter