‘डिमेंशिया’वर मात करण्यासाठी राष्ट्रीय धोरणाची गरज, तज्ज्ञांचं मत

भारतात जवळपास ४.१ दशलक्ष व्यक्ती ‘डिमेंशिया’ने ग्रस्त आहेत. या व्यक्तींसाठी सरकारी पातळीवर ठोस उपाययोजना नाही. त्यामुळे सरकारने डिमेंशियाग्रस्तांसाठी एक राष्ट्रीय कार्यक्रम आखावा अशी मागणी तज्ज्ञांनी केलीये. इंग्लंडमध्ये ५० टक्के ‘डिमेंशिया’ ग्रस्तांना सरकारी योजनेचा लाभ मिळत नसल्याचं पुढे आलंय. यानंतर माय मेडिकल मंत्राने भारतीय तज्ज्ञांकडून त्यांचं मत जाणून घेतलं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • भारतात ४.१ दशलक्ष लोकांना डिमेंशिया
  • २०३३ पर्यंत ‘डिमेंशिया’ ग्रस्तांची संख्या दुपटीने वाढण्याचा अंदाज
  • महाराष्ट्र, उत्तरप्रदेशात २०२६ पर्यंत डिमेंशियाचे ५ लाख रूग्ण
  • अल्झायमर्स आणि रिलेटेड डिसऑर्डस सोसायटी ऑफ इंडियाचा अहवाल

डिमेंशिया हा प्रामुख्याने उतारवयात होणारा आजार आहे. भारतात, मोठ्या प्रमाणावर डिमेंशिया ग्रस्तांची संख्या आहे. दिवसेंदिवस हा आजार वाढतोय. त्यामुळे, सरकारने डिमेंशिया ग्रस्तांसाठी राष्ट्रीय योजना सुरू करावी अशी तज्ज्ञांची मागणी आहे.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना दिल्लीच्या ह्युमन बिहेविअर अॅन्ड अलाईड सायन्सेसचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ओम प्रकाश म्हणतात, “भारतात ‘डिमेंशिया’ ग्रस्तांची काळजी घेण्यासाठी अजूनही काही उपाययोजना नाही. राष्ट्रीय स्तरावर डिमेन्शिया ग्रस्तांची काळजी घेण्यासाठी एक राष्ट्रीय प्लान आखण्याची गरज आहे. यासाठी आरोग्य मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटना आणि सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.”

ज्येष्ठ नागरीकांसाठी काम करणाऱ्या सिल्व्हर इनिंग नावाच्या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शैलेश मिश्रा माय मेडिकल मंत्राशी बोलताना म्हणतात, “पाश्चिमात्य देशात डिमेंशिया ग्रस्तांची संख्या जास्त आहे. भारतात, ४.३ टक्के लोकं डिमेंशियाने आजारी आहेत. हा आकडा खूप मोठा असण्याची शक्यता आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये डिमेंशियासाठी सरकारी उपाययोजना आहेत. सरकारकडून डिमेंशिया ग्रस्त लोकांना मदत केली जाते. भारतात डिमेंशिया ग्रस्तांची काळजी फक्त सामाजिक संघटनाच घेतात.”

शैलेश मिश्रा पुढे म्हणतात, “आम्ही सरकारसोबत डिमेंशिया ग्रस्तांसाठी उपाययोजना करण्याचासाठी प्रयत्नशील आहोत. याबाबत सरकारने आत्ताच पावलं उचलली नाहीत तर, येत्या १० वर्षात डिमेंशिया भारतासाठी खूप मोठं आव्हानं बनेल.”

डिमेंशियाबाबत बोलताना डॉ. अविनाश डी-सूजा म्हणतात, “भारतात मोठ्या प्रमाणावर लोकं डिमेंशियाने ग्रस्त आहेत. पण, कुटुंबीयांकडून त्यांची काळजी घेतली जाते. भारतात डिमेंशियाग्रस्तांसाठी डे-केअर सेंटर आहेत. पण, जास्त कालावधीसाठी री-हॅंब सेंटर नाहीत.”

‘डिमेंशिया’ हा एक मानसिक आजार आहे. या आजारात व्यक्तीला नैराश्य येतं. आपलं या जगात कोणीच नाही अशी भावना रुग्णांच्या मनात तयार होते. डिमेंशियावर औषधं आहेत. पण, सरकारी स्तरावर या रुग्णांसाठी एक राष्ट्रीय कार्यक्रम असावा अशी तज्ज्ञांची मागणी आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter