राष्ट्रीय आरोग्य मिशन कर्मचाऱ्यांचं 19 डिसेंबरला कामबंद आंदोलन?

महाराष्ट्र सरकारद्वारे लवकरच आरोग्य खात्यात मेगा भरती केली जाणार असून यामध्ये ‘एनआरएचएम’ कर्मचाऱ्यांना वगळण्यात आल्याने या विरोधात 19 डिसेंबर रोजी राज्यभरातील डॉक्टर आणि परिचारिका मुंबईतील आझाद मैदानात धडकणार आहेत.

0
280
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान’ (एनआरएचएम) अंतर्गत आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीवर कार्यरत डॉक्टर आणि परिचारिकांनी पुन्हा एकदा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. महाराष्ट्र सरकारद्वारे लवकरच आरोग्य खात्यात मेगा भरती केली जाणार असून यामध्ये ‘एनआरएचएम’ कर्मचाऱ्यांना वगळण्यात आल्याने या विरोधात 19 डिसेंबर रोजी राज्यभरातील डॉक्टर आणि परिचारिका मुंबईतील आझाद मैदानात धडकणार आहेत.

राष्ट्रीय आरोग्य मिशन कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत समाविष्ठ करून घेण्यासाठी मंत्र्याची समिती गठीत केली होती. ही समिती बैठकीत चर्चा करून तीन महिन्यात अंतिम निर्णय देणार होती. मात्र अद्याप केवळ एकच बैठक झाली असून कुठलाही निर्णय झालेला नाही. जोपर्यंत या समितीचा अहवाल प्राप्त होत नाही तोवर नव्याने आरोग्य विभागात भरती करून घेतली जाणार नाही, असं आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी म्हटलं होतं.

परंतु, आता सरकारद्वारे लवकरच मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याने ‘एनआरएचएम’ कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. या आंदोलनामुळे राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावरील आरोग्य यंत्रणा पूर्णतः बंद राहील.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना राष्ट्रीय आरोग्य अभियान युनियन राज्य अध्यक्ष नंदूकिशोर कासार म्हणाले की, “शिक्षणाच्या आणि अनुभवाच्या आधारे कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत समाविष्ठ करून घेण्यास राज्य सरकार टाळाटाळ करतंय. या विरोधात राष्ट्रीय आरोग्य मिशनचे डॉक्टर व परिचारिका 19 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात कामबंद आंदोलन पुकारलं जाईल. आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी मे महिन्यात बेमुदत संप पुकारला होता. त्यानंतर आमच्या मागण्यांसाठी तोडगा निघावा म्हणून तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. मात्र या समितीद्वारे कुठलाही निर्णय झाला नाही.”

‘‘जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघत नाही तोपर्यंत नव्यानं भरती करणार नाही, असं सरकारने आश्वासन दिलं होतं. पण या आश्वासनांना बगल देत आता भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत असून यातून राष्ट्रीय आरोग्य मिशन कर्मचाऱ्यांना वगळलंय. या पार्श्वभूमीवर सरकारच्या विरोधात कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतलायं’’ असंही कासार म्हणाले.

  • ग्रामीण भागात सेवा मिळावी म्हणून 12 एप्रिल 2005 पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) सुरू केलंय.
  • महाराष्ट्रातील जिल्हा रुग्णालयं, ग्रामीण रुग्णालयं, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात या अभियानाद्वारे 6,500 डॉक्टर्स, 7000 परिचारिका आणि 5,500 अधिपरिचारिका कार्यरत आहेत.

या योजनेद्वारे डॉक्टरांना महिन्याला 22 हजार तर परिचारिकांना 15 हजार वेतन मिळतं. कामाच्या तुलनेत हे मानधन खूपच कमी आहे. हे लक्षात घेऊन आरोग्य विभागात निघणाऱ्या भरती प्रक्रियेत आम्हाला समाविष्ठ करून घेण्यात यावं अशी मागणी राष्ट्रीय आरोग्य अभियान युनियनकडून केली जातेय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter