गळा न चिरता थायरॉईडवर शस्त्रक्रिया

सुहानीच्या ओठांच्या खालच्या बाजूने शस्त्रक्रिया सुरू केली. ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रियेची खूण राहिली नाही. थायरॉईडवर ‘एन्डोस्कोपिक’ शस्त्रक्रिया करणारे डॉ. क्षिजीत शहा पहिले नाक-कान-घसा विशेषज्ञ आहेत. ‘एन्डोस्कोपिक’ शस्त्रक्रियेत दुर्बिणीतून कॅमेऱ्याच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केली जाते.

1
295
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

थायरॉईडने ग्रस्त आहात… शस्त्रक्रिया करायची की नाही, याचा विचार करताय… मग आता घाबरू नका. थायरॉईडच्या उपचारांसाठी आता गळा चिरण्याची गरज नाही. सायन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी थायरॉईडवर ‘एन्डोस्कोपिक’ पद्धतीने यशस्वी शस्त्रक्रिया केलीये. मुंबईतल्या सरकारी रुग्णालयात करण्यात आलेली ही दुसरी शस्त्रक्रिया आहे. याआधी २०१६मध्ये सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अशाच प्रकारची पहिली शस्त्रक्रिया केली होती.

धारावीत राहणारी १९ वर्षांची सुहानी मिश्राच्या गळ्याभोवती सूज आली होती. तपासणीअंती स्पष्ट झालं की सुहानीला थायरॉईडचा त्रास आहे.

‘माय मेडिकल मंत्रा’शी बोलताना सायन रुग्णालयाच्या नाक-कान-घसा विभागाचे डॉक्टर क्षितीज शहा म्हणतात की, “सुहानी तरुण असल्याने आम्ही तिला ही शस्त्रक्रिया सुचवली. या शस्त्रक्रियेत गळा चिरण्याची गरज नसते. त्यामुळे सुहानीने ही शस्त्रक्रिया करण्यास आपली संमती दर्शवली.”

डॉ. शहा पुढे सांगतात, “आम्ही सुहानीच्या ओठांच्या खालच्या बाजूने शस्त्रक्रिया सुरू केली. ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रियेची खूण राहिली नाही. थायरॉईडवर ‘एन्डोस्कोपिक’ शस्त्रक्रिया करणारे डॉ. क्षिजीत शहा पहिले नाक-कान-घसा विशेषज्ञ आहेत. ‘एन्डोस्कोपिक’ शस्त्रक्रियेत दुर्बिणीतून कॅमेऱ्याच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केली जाते.

“थायरॉईडचा सर्वात जास्त त्रास महिलांना होतो, सामान्यत: केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेमध्ये घशाला चिर देऊन थायरॉईड ग्रंथींवर शस्त्रक्रिया केली जाते. ज्यात महिलेच्या मानेवर शस्त्रक्रियेचा व्रण राहतो,” असं डॉ. शहांचं म्हणणं आहे.

सुहानीने घशावर शस्त्रक्रिया केल्याचा व्रण दिसेल या भीतीने गेली एक वर्ष शस्त्रक्रिया केली नव्हती. पण,गेल्या आठवड्यात तिच्यावर सायन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आलीये.

डॉक्टर क्षितिज शहा
डॉक्टर क्षितिज शहा

डॉ. शहा पुढे सांगतात, घसा चिरून केलेल्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या मानेवर ५-७ सेंटिमीटर लांब व्रण राहतो. तसंच आवाजही बदलण्याची शक्यता असते.

डॉ. शहा म्हणतात, घसा चिरून केलेल्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला बरं होण्यात वेळ लागतो. मान वळवण्यासही त्रास होतो. शस्त्रक्रियेत खूप रक्त वाया जातं. ‘एन्डोस्कोपिक’ शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन तासातच सुहानी सहजतेने मान वळवू लागली.

सायन रुग्णालयात आठवड्याला दोन ते तीन रुग्ण थायरॉईडच्या आजाराची शस्त्रक्रिया करण्यासाठी येतात. डॉ. शहा सांगतात, “या शस्त्रक्रियेसाठी सुहानीकडून आम्ही फक्त पाच हजार रुपये घेतले. ही शस्त्रक्रिया रुग्णांसाठी वरदान ठरणारी आहे.”

मुंबईतल्या सर जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी २०१६मध्ये पहिल्यांदा ‘एन्डोस्कोपिक’ पद्धतीने थायरॉईडवर ही शस्त्रक्रिया केली होती. जे. जे. रुग्णालयाचे डॉ. अमोर वाघ यांच्या म्हणण्याप्रमाणे, “सरकारी रुग्णालयाचे डॉक्टर ही शस्त्रक्रिया करू शकतात, ही गरीब रुग्णांसाठी चांगली गोष्ट आहे. आमच्याकडे दररोज थायरॉईडच्या आजाराने ग्रस्त २-३ रुग्ण येतात. गेल्या वर्षभरात आम्ही १० रुग्णांवर या पद्धतीने उपचार केले आहेत.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

1 COMMENT

Comments are closed.