मुंबई- डॉक्टरांनी वाचवले हृदयाच्या दुर्मिळ समस्येने ग्रस्त व्यक्तीचे प्राण

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका 73 वर्षीय व्यक्तीला नव्याने जीवनदान दिलं आहे. या व्यक्तीला हृदयासंदर्भातील गंभीर आणि दुर्मिळ परिस्थिती (condition) उद्भवली होती. यामध्ये डॉक्टरांनी वेळीच निदान आणि योग्य ते उपचार करून या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. जवळपास 15 शॉक देऊन या व्यक्तीवर उपचार करण्यात आले.

मुंबईतील कुलाब्यामध्ये राहणाऱ्या 73 वर्षीय व्यक्तीला सतत चक्कर येण्याची समस्या जाणवत होती. दोन आठवड्यांपूर्वी 3 वेळा चक्कर आल्यामुळे अखेर त्यांना नातेवाईकांनी बॉम्बे रूग्णालयातील दाखल केलं. रूग्णालयात दाखल केल्यानंतर देखील ते बेशुद्धचं होते. डॉक्टरांनी अधिक तपासणी केल्यानंतर या व्यक्तीला Ventricular tachycardia storm या हृदयाच्या समस्येचं निदान करण्यात आलं.

Ventricular tachycardia storm ही हृदयासंबंधी एक समस्या असून यामध्ये हृदयाचं पंपिंग कमी होतं. यामुळे हार्ट फेल्यूअर होऊन रूग्ण अचानक दगावण्याची शक्यता असते. यामध्ये हृदयाच्या व्हेंट्रिकल्समध्ये इलेक्ट्रिकल अॅक्टिव्हिटी योग्यरित्या होत नाही.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना बॉम्बे हॉस्पिटलचे इंटरनॅशनल कार्डियोलॉजीस्ट डॉ. नागेश वाघमारे म्हणाले, “या व्यक्तीची बऱ्याच वर्षांपूर्वी बायपास सर्जरी करण्यात आली होती. याशिवाय 7 वर्षांपासून तेते पार्किन्सन आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना नेमकं चक्कर येण्याचा त्रास का झाला याचं कारण समजणं अवघड होतं. या व्यक्तीचा ईसीजी काढून इतर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये हृदयाच्या दुर्मिळ अशा Ventricular tachycardia storm समस्येचं निदान करण्यात आलं.”

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, या परिस्थितीत रूग्णाला वाचवणं खूप कठीण असतं. अशावेळी रूग्णाला शॉक ट्रिटमेंट दिली जाते.

डॉ. नागेश पुढे म्हणाले, “या समस्येमुळे त्या व्यक्तीचं हृदय केवळ 25 टक्के कार्यरत होतं. त्यामुळे त्यांच्यावर शॉक देऊन उपचार करण्यात आले. जवळपास 36 तासांमध्ये 15 वेळा या व्यक्तीला शॉक ट्रिटमेंट देण्यात आली. अशा प्रक्रियेत सामान्यपणे 4-5 वेळा रूग्णाला शॉक देण्यात येतात. त्यानंतर या व्यक्तीला सर्व औषधं देण्यात आली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. यानंतर temporary pacemaker बसवून cardiac resynchronization थेरेपीद्वारे उपचार केले.”

यानंतर रूग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली आणि आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्बल 2 आठवड्यानंतर हा रूग्ण स्वतःच्या पायावर चालत घरी गेला.

हृदयाच्या या परिस्थितीबाबत लोकांमध्ये फार कमी प्रमाणात जनजागृती आहे. शिवाय या समस्येसाठी असणाऱ्या थेरेपीचे उपचार महाग असल्याने अनेक रूग्ण हे उपचार करून घेत नाहीत.

डॉ. नागेश यांच्या सांगण्यानुसार, अशा परिस्थितीत रूग्णाला वाचवणं फार कठीण असतं. हृदयाचं कार्य मंदावत असल्याने रूग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे वेळीच निदान आणि उपचार होणं गरजेचं आहे. यासाठी याबाबत जनजागृती होणं आवश्यक आहे. जेणेकरून लोकांना हृदयाच्या या परिस्थितीची माहिती होईल. याशिवाय या उपचारांचा खर्च महागडा आहे. त्यामुळे सरकाने यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत विचार केला पाहिजे.

बॉम्बे रूग्णालयाचे फिजीशियन आणि इन्टेसिविस्ट डॉ. फारूख वकील, इंटरवेंशनल कार्डियोलॉजीस्ट डॉ. नागेश वाघमारे, अॅनेस्थेशिया विभागाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा कुलकर्णी आणि निवासी डॉ. आकाश रामचंदानी यांच्यासोबत स्टाफ नर्स सुप्रिया साठे आणि टेक्निशियन रवी पाटील यांच्या मदतीने या व्यक्तीवर उपचार करून त्यांना जीवनदान देण्यात आलंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter