‘तोंड’ येण्याची कारणं आणि उपाय

तोंड येणं हा त्रास आपल्यापैकी अनेकांनी अनुभवला असेल. यामध्ये तोंडाच्या आतल्या बाजूला जखम होते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, हा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो. जर ही समस्या अधिक असेल तर डॉक्टरांना जरूर दाखवावं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

शरीरात अतिप्रमाणात उष्णता निर्माण झाली की अनेकवेळा आपल्याला तोंड येतं. यामध्ये तोंडाच्या आतील भाग लाल होतो. ही समस्या फार वेदनादायक असते. यामुळे खाण्या-पिण्यामध्येही अडथळा निर्माण होतो. या समस्येला माऊथ अल्सर म्हणतात.

तोंड येण्याची कारणं

 • तोंडात एखादी जखम होणं
 • महिलांना मासिक पाळीच्या अगोदर हार्मोन्समध्ये बदल झाल्याने
 • शरीरात व्हिटॅमिन बीची कमतरता
 • मानसिक ताणतणाव
 • अपुरी झोप
 • तोंडातील जंतूंमुळे अलर्जी झाल्याने

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, काही वेळा तोंड येणं ही गंभीर आजारांची चिन्ह देखील असू शकतात. त्यामुळे वेळीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

याविषयी मुंबईतील बोरिवलीच्या डेंटिस्ट डॉक्टर सुनिता भोसले सांगतात की, “तोंड येण्याच्या समस्येची कारणं ही वेगवेगळी असतात. त्यामुळे यावर उपचार करतेवेळी ही समस्या कोणत्या कारणाने निर्माण झालीये, हे जाणून घेणं आवश्यक असतं. आणि त्यानुसार त्यावर उपचार करणं गरजेचं आहे. म्हणून ही समस्या निर्माण होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.”

तोंड आल्यास त्यावर काय उपचार कराल

 • डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधं घ्या
 • तोंड आलंय तिथे थोडावेळ बर्फ लावावा
 • व्हिटॅमिन बी६ आणि व्हिटॅमिन बी१२ च्या सप्लीमेंट्स घ्या

प्रतिबंध कसा कराल

 • आबंट चवीची फळं खाऊ नये. जसं की, अननस, संत्र, लिंबू
 • मसालेदार पदार्थ खाऊ नये.
 • तोंडाची स्वच्छता राखा
 • पुरेसा आराम आणि झोप घ्या
 • पोट साफ ठेवा

मुंबईतील डेंटिस्ट डॉ. प्रियांक बजानी यांच्या सांगण्यानुसार, “तोंड येण्याचा हा त्रास कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. शरीरातील उष्णता वाढली की, हा त्रास होऊ शकतो. तसंच ज्या व्यक्तींना अॅसिडीटी आणि ताणतणाव आहे यांना देखील ही समस्या होऊ शकते. शक्यतो हा त्रास एका आठवड्यात दूर होतो. मात्र जर, हा त्रास एका आढवड्याहून जास्त जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवणं फायदेशीर ठरेल.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter