तोंडाच्या कॅन्सरबाबत ‘डिजिटल’ जनजागृती

सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. त्यामुळे रुग्णांचे प्राथमिक स्तरावर निदान व्हावं यासाठी ‘प्री मालिग्नंट लेसन इन ओरल कॅव्हीटी’ हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. तोंडाचा कर्करोग म्हणजे नेमकं काय. तोंडाच्या कर्करोगाचं वेळीच निदान कसं करावं आणि हा आजार टाळण्यासाठी काय उपाय करणं आवश्यक आहे, यासंदर्भात ऑनलाईन पद्धतीने लोकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे.

0
74
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

तोंडाचा कर्करोग भारतात झपाट्याने पसरतोय. जगभरात साधारणतः तीन लाख रुग्ण या आजाराने पीडित आहेत. त्यातील ८६ टक्के हे एकट्या भारतात आहेत. त्यामुळे या कर्करोगावर आळा घालण्याच्या दृष्टीने टाटा रुग्णालय आणि इंडियन डेंटल असोसिएशनने एक मोहीम आखलीये. याद्वारे एक डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून तोंडाच्या कर्करोगाबाबत जागृती आणि प्राथमिक स्तरावर निदान आणि उपचार केले जातील.

या मोहिमेसंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना टाटा मेमोरिअल रुग्णालयातील कर्करोगतज्ज्ञ प्रा. डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाले की, “शीर व मानेचा कर्करोग ही भारतातील एक गंभीर समस्या बनू लागली आहे. त्यातच आता तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णसंख्येतही प्रकर्षाने वाढ होतेय. तोंडाचा कर्करोग हा दारू, आणि तंबाखूच्या व्यसनांमुळे होतो. गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर सरकारने बंदी घातलेली असूनही या गोष्टी देशात अगदी सहजपणे उपलब्ध आहेत, हेच दुदैव म्हणावं लागेल.”

डॉ. चतुर्वेदी पुढे म्हणाले की, “तोंडाच्या कर्करोगाचे रूग्ण वाढत आहेत. अनेकदा रुग्ण उशीरा उपचारांसाठी आल्याने रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे तोंडाच्या कॅन्सरचं प्राथमिक स्तरावर निदान आणि उपचार व्हावेत याकरता इंडियन डेंटल असोसिएशनच्या सहाय्याने ‘प्री मालिग्नंट लेसन इन ओरल कॅव्हीटी’ हा डिजिटल उपक्रम नुकताच सुरू करण्यात आलाय.”

‘प्री मालिग्नंट लेसन इन ओरल कॅव्हीटी’ या उपक्रमाद्वारे तोंडाचा कर्करोग म्हणजे नेमकं काय. याशिवाय तोंडाच्या कर्करोगाचं वेळीच निदान कसं करावं आणि हा आजार टाळण्यासाठी काय उपाय करणं आवश्यक आहे, यासंदर्भात ऑनलाईन पद्धतीने लोकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. टाटा रुग्णालयाच्या वेबसाईटवरून ही माहिती दिली जाणार आहे. टाटा रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी ही माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तोंडाच्या कॅन्सरबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना इंडियन डेंटल असोसिएशनचे मानद सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे म्हणाले की, “तोंडाचा कर्करोग टाळण्यासाठी टाटा रुग्णालय आणि आम्ही मिळून एक डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. याद्वारे कर्करोगाला नियंत्रणात ठेवणे हा मुख्य उद्देश आहे. इतकंच नव्हे तर, तोंडाच्या कर्करोगाबाबत रुग्णालय, शाळा व समाजातील लोकांमध्ये जागरूकताही निर्माण करण्यात येणार आहे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter