पूरग्रस्तांना आरोग्य सेवा देण्यासाठी महाराष्ट्रातील 100 डॉक्टर केरळला पोहोचलेत. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्यासोबत सर्व डॉक्टरांची टीम आणि अधिकाऱ्यांचं पथक त्रिवेंद्रममध्ये दाखल झालंय. लवकरच हे डॉक्टरांचं पथक विविध भागात जाऊन नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करणार आहेत. डॉक्टरांनी महाराष्ट्रातून येताना औषधं आणि खाद्यपदार्थांचा मुबलक प्रमाणात साठा आणलाय. जेणेकरून इथल्या नागरिकांना कोणतीही कमी भासणार नाही.
यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन म्हणाले की, “पुण्यातील ससून आणि मुंबईतील जे.जे रूग्णालयातील 100 डॉक्टरांची टीम या ठिकाणी दाखल झालीये. यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांचा समावेश आहे. यासोबत महाराष्ट्रातून औषधांचा मुबलक साठा आणण्यात आलाय. जवळपास तीन-चार दिवस पुरेल इतका साठा आहे.”
महाजन पुढे म्हणाले की, “या ठिकाणी आता हे अधिकारी आवश्यक ठिकाणी जाऊन नागरिकांवर औषधोपचार करतील. यामध्ये रूग्णांची तपासणीही केली जाईल. याशिवाय अजून गरज भासल्यास पुढच्या टप्प्यात म्हणजे दोन-तीन दिवसांत पुढची टीम या ठिकाणी दाखल करण्यात येईल. या ठिकाणी डॉक्टर किंवा मेडिसीन कमी न पडून देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये. जितके दिवस आवश्यकता असेल तितके दिवस मी या ठिकाणी थांबणार आहे.”
महापुरानंतर केरळात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होतेय. त्यामुळे डॉक्टर आणि औषधांची केरळला सद्य स्थितीला सर्वात जास्त गरज आहे. केरळला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेत नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी 100 डॉक्टरांची टीम पाठवलीये.