मुंबई: साथींच्या आजारांची माहिती देणारं अॅप लाँच

मुंबईमध्ये पसरणाऱ्या साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी मुंबई पालिकेनं एक डिजीटल पाऊल उचललंय. लोकांना सर्व आजारांची माहिती समजण्यासाठी एक नवीन अॅप तयार करण्यात आलंय. ‘मान्सून रिलेटेड डिसीज’ असं या अॅपचं नाव आहे. पालिकेच्या तिन्ही प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते या नव्या अॅपचे अनावरण करण्यात आलंय.

0
273
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पावसाळ्यात शक्यतो पोषक वातावरण मिळत असल्याने मलेरिया, डेंग्यू व लेप्टो यांसारखे विविध साथीचे आजार पसरतात. या आजारांवर वेळीच मात करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध पद्धतीने जागरूकता निर्माण करण्याचं काम सुरु आहे. लोकांना सर्व आजारांची माहिती समजण्यासाठी ‘मान्सून रिलेटेड डिसीज’ हे अॅप तयार करण्यात आलं होतं आणि या अॅपचं मंगळवारी अनावरण करण्यात आलंय.

शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात या नव्या अॅपचे अनावरण करण्यात आलं. या नव्या अॅपबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना पालिकेच्या तिन्ही प्रमुख रुग्णालयांचे वैद्यकीय संचालक डॉ. अविनाश सुपे म्हणाले की, “सध्या संसर्गजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. अनेकदा आजारांची लक्षणं लोकांना माहिती नसल्याने बहुतांश लोक घरगुती उपाय करत राहतात. त्यातूनही बरं न वाटल्यास डॉक्टरांकडे उपचारांसाठी येतात. पण अनेकदा तोपर्यंत उशीर झालेला असतो. अशावेळी अॅपच्या माध्यमातून लोकांना आजारांची माहिती देण्याचा हा नवा उपक्रम खऱ्या अर्थाने स्वागतार्ह आहे.”

पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर म्हणाल्या की, “या अॅपद्वारे साथीचे आजार कोणते त्याची लक्षणे व उपाय कोणती याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. जेणेकरून लोकांना अॅपच्या माध्यमातून सर्व गोष्टी पटकन समजू शकतील. यामुळे आजारांचा प्रसार रोखण्यासही मदत मिळणार आहे. शिवाय अॅपमध्ये सतत नवनवीन गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे.”

शीव रुग्णालयाच्या जनऔषधशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. सीमा बनसोडे सांगतात की, “विविध साथींच्या आजारांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी या अनुषंगाने हा अॅप तयार करण्यात आला आहे. या अॅपमध्ये प्रामुख्याने पाच आजारांचा समावेश असणार आहे. जसं, स्वाईन फ्लू, डेंग्यू, लेप्टो, मलेरिया व चिकनगुनिया. विशेषतः सध्या या आजारांच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होतेय. यावर आळा घालण्याच्या दृष्टीने हे अॅप बनवला आहे. या अॅपमध्ये संबंधित आजार काय आहे? काय केले पाहिजे? याबाबत संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे.”

डॉ. बनसोडे पुढे म्हणाल्या की, “हे अॅप कोणत्याही अड्रॉईंड मोबाईलद्वारे विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे. हा अॅप मराठी, हिंदी, इंग्लिश आणि उर्दु भाषेत उपलब्ध करून दिला आहे. इतकंच नाहीतर मुंबईतील 24 वॉर्डातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी व घराजवळील रक्तपेढीची माहितीही उपलब्ध होणार आहे.”

याप्रसंगी पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रविण शिनगारे, नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिकुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, शीव रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांच्यासह राज्यातील विविध डॉक्टर उपस्थित होते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter