मुंबई- नायर रूग्णालयात नवजात बालकांसाठी ‘मिल्क बँक’ सुविधा

मुंबई पालिकेच्या शीव आणि केईएम रुग्णालयानंतर आता नायर रुग्णालयातही नवजात बालकांसाठी मातृदुग्ध पेढी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय अचानक प्रसूती झाल्यानंतरही बाळाला आईकडेच ठेवता यावं यासाठी रुग्णालयात ‘कांगारू मदर केअर’ ही सुविधाही नव्यानं सुरू करण्यात आलीये. रुग्णालय प्रशासनानं या निर्णयामुळे गर्भवती महिला व नवजात बालकांना दिलासा मिळणार आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

बाळाला जन्मानंतर अर्ध्या तासात आईचं दूध मिळणं गरजेचं असतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे, बाळ सहा महिन्यांचं होईपर्यंत बाळाला स्तनपान मिळणं आवश्यक असतं. आईच्या दूधातील पौष्टीक घटकांमुळे बाळाची योग्यरित्या वाढ होतेच शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. मात्र अनेक माता काही कारणांमुळे बाऴाला दूध देऊ शकत नाहीत. अशी नवजात बाळं आईच्या दूधापासून वंचित राहू नये यासाठी मुंबई महापालिकेच्या नाय़र रूग्णालयात ‘मातृदुग्ध पेढी’ म्हणजेचं मिल्क बँक सुरु कऱण्यात आलीये.

  • मातेचं दूध न मिळाल्याने जगभरात १३ लाख ते साडे अठरा लाख बालकांचा मृत्यू
  • यासाठी मातृदुग्ध पेढी ही संकल्पना जगभर राबवण्यात येते.
  • जगभरात ५१७ मातृदुग्ध पेढ्या आहेत तर भारतात १३ मातृदुग्ध पेढ्या
  • मुंबईत जे.जे.रुग्णालय, शीव रुग्णालय, राजावाडी रुग्णालय आणि केईएम या रुग्णालांमध्ये मिल्क बँक सुविधा उपलब्ध आहे

ज्या नवजात बाळांना दूध मिळत नाही त्यांना गायीचं दूध किंवा दुधाची पावडर वापरली जाते. नवजात बाळांना दिवसभरात तीन-चार वेळा दुधाची गरज असल्याने दिवसाला ३ ते ४ लीटर दुधाची गरज भासते. म्हणूनच नायर रुग्णालयातही मातृदुग्ध पेढी सुरू केलीये.

मातृदुग्ध पेढीत अन्य मातांकडून दुध घेऊन संकलित केलं जातं. या दुधाची तपासणी, प्रक्रिया केल्यानंतर गरजू नवजात बालकांना दिलं जातं.

यासंदर्भात बोलताना नायर रुग्णालयातील बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. सुषमा मलिक यांनी सांगितलं की, “अनेकदा महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिला दूध येत नाही. मातेला दुध येत नसल्यानं अशा बाळांसाठी मातृदुग्ध पेढी हा एकमेव पर्याय असतो. या पेढीच्या माध्यमातून अन्य मातांनी दान केलेलं दुध बाळाला पाजलं जातं. रुग्णालयात दर महिन्याला ३२ ते ४० अशा महिला असतात ज्यांना दूध पुरेशा प्रमाणात येत नाही. त्यामुळे आम्ही रुग्णालयात ही मातृदुग्ध पेढी सुरू केलीये.”

मातृदुग्ध कोण दान करू शकतील

  • ज्या मातांना अतिरिक्त दूध येतं
  • ज्या मातेला कुठलाही आजार नाही
  • अकाली जन्माला आलेल्या बाळांचे माता
  • माता ज्यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला आहे

शिवाय नायर रुग्णालयात कांगारू मदर केअर ही सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलीये. यामध्ये जन्मानंतर बाळाला आईजवळचं ठेवलं जातं. यासठी रुग्णालयानं सहा नवीन बेड आणि फ्लोटिंग चेअर उपलब्ध करून दिलेत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter