कॅन्सरग्रस्तांसाठी ‘अनोखी’ हेअरस्टाईल

अहमदाबादमध्ये राहणाऱ्या एका वैद्यकीय विद्यार्थीनीने कॅन्सरग्रस्तांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कॅन्सरने ग्रस्त असलेल्या रूग्णांसाठी तिने स्वतःचे लांबसडक केस दान केले आहेत. तिच्या या कामगिरीने त्यांनी समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

0
531
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

“कालपर्यंत माझ्या डोक्यावर केस होते मात्र आज माझ्या डोक्यावर एकही केस नाही. डोक्यावर अचानक केस नसल्याने थोडं चुकल्यासारखं वाटतंय. मात्र केस गमावल्याचं दुःख मला नाहीये. कारण मी केस गमवण्यापेक्षा कॅन्सरग्रस्त रूग्ण त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी गमावतात. त्यामुळे त्यांनी गमावलेल्या गोष्टींपुढे माझ्या केसांचं दान फार छोटं आहे.”

अनोखी पटेल

लांबसडक काळेभोर केस म्हणजे मुलींच्या सौंदर्याची जणू ओळख असते. त्यामुळे केस कापायचे जरी झाले तरी मुलींना जीवावर येतं. मात्र अहमदाबादमध्ये राहणारी वैद्यकीय विद्यार्थीनी अनोखी पटेलने (20) कॅन्सरग्रस्तांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन स्वतःचे लांबसडक केस दान केले आहेत. तिच्या या कामगिरीने तिने समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना अनोखी म्हणाली, “वैद्यकीय विद्यार्थीनी असल्याने कॅन्सर आणि या आजाराचे रूग्ण मी पाहिलेत. हे रूग्ण फार कठीण परिस्थितीला तोंड देतात. त्यामुळे या रूग्णांसाठी काहीतरी करावं अशी भावना मनात होती. याचसाठी मी माझे केस दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी मी माझे सर्व केस दान केले आहेत. केसांवर माझं प्रचंड प्रेम होतं. मात्र माझ्या दान केलेल्या केसांमुळे इतरांच्या सौंदर्यात भर पडेल याच गोष्टीचं मनाला समाधान आहे.”

अनोखी पटेल

अहमदाबादच्या AMC MET वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला अनोखी शिकते. मुंबईत कॅन्सरग्रस्तांसाठी कार्यरत असलेल्या ‘कोप विथ कॅन्सर’ या संस्थेसाठी अनोखीने केस दान केले आहेत. या संस्थेद्वारे कॅन्सरग्रस्तांना मदत करण्यात येते.

अनोखी पुढे म्हणते, “दान केलेल्या केसांचा विग बनवून गरजू कॅन्सरग्रस्तांना देण्यात येतो. माझ्या केसांनी बनवलेल्या विगचा गरजू कॅन्सरग्रस्तांना फायदा होणार असल्याचा मला आनंद आहे. कॅन्सरग्रस्त रूग्णांना त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी गमवाव्या लागतात. त्यामुळे त्यांनी गमावलेल्या गोष्टींसमोर मी गमावलेले केस फारच छोटी गोष्ट आहे. मी खास कॅन्सरग्रस्तांसाठी हेअरस्टाईल केली आहे असंही म्हणायला हरकत नाही.”

इतकंच नाही तर अनोखीला वेळ मिळाला की अहमदाबादमध्ये कॅन्सर रूग्णांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेला ती आवर्जून भेट देते. अनोखीच्या सांगण्यानुसार, “या संस्थेमध्ये अनेक कॅन्सरग्रस्त लोकं असतात शिवाय काहींनी कॅन्सरला नमवलेलं असतं. रविवारी वेळ मिळाल्यास मी या लोकांना भेटून येते. या व्यक्तींमधील जिद्द आणि एनर्जीमुळे मी प्रोत्साहित होते.”

WhatsApp Image 2019-09-10 at 6.55.04 PM

केस काढण्याच्या अनोखीच्या अनोख्या निर्णयाचं तिच्या कुटुंबियांनी देखील स्वागत केलंय. अनोखी म्हणते, “माझ्या या निर्णयाने माझ्या कुटुंबियांना आनंद झाला आहे. यासाठी त्यांनी देखील मला खूप पाठिंबा दिलाय. त्यासाठी मी माझ्या कुटुंबियांचे धन्यवाद मानते.”

“माझ्यासारखे प्रत्येकाने केस दान केले पाहिजेत असं नाही. कॅन्सरने ग्रस्त असलेल्या रूग्णांसाठी आपण इतरही गोष्टी करू शकतो. त्यांना वेळ देऊ शकतो, कॅन्सरग्रस्त लहान मुलांना खेळणी किंवा पुस्तक देऊ शकतो. या रूग्णांना मी माझ्या परीने मदत करण्याचा एक छोटा प्रयत्न केला आहे. तुम्ही देखील विविध मार्गाने त्यांना मदत करू शकता,” असंही अनोखीने सांगितलं आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter