लवकरच होणार निवासी डॉक्टरांच्या कामाचे तास निश्चित

कामाचे तास निश्चित करा अशी मागणी अनेक वर्षांपासून ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडन्स डॉक्टर्स’ (मार्ड) संघटनाद्वारे केली जातेय. या मागणीची दखल वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने (डिएमईआर) घेतलीये. सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांच्या कामाचं स्वरूप आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी स्वतंत्र कमिटी गठीत कऱण्याची सूचना दिलीये.

0
684
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

ड्युटीचे जास्त तास, कामाचा वाढलेला ताण आणि अतिरिक्त ताणामुळे डॉक्टरांची पूर्ण होत नसलेली झोप….यासाठीच कामाचे तास निश्चित करा अशी मागणी अनेक वर्षांपासून ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडन्स डॉक्टर्स’ (मार्ड) संघटनाद्वारे केली जातेय. या मागणीची दखल वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने (डिएमईआर) घेतलीये. सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांच्या कामाचं स्वरूप आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत कऱण्याची सूचना दिलीये.

नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि मुंबईतील सरकारी रुग्णालयातील प्रत्येक विभागातील एक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, एक सहाय्यक प्राध्यापक, एक कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांचा या कमिटीत समावेश असणार आहे. या समितीद्वारे कनिष्ठ निवासी डॉक्टर 1,2,3 आणि वरिष्ठ निवासी 1,2,3 यांची पदव्युत्तर शिक्षण घेताना रूग्णसेवेची भूमिका, उद्दिष्टं, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय असतील याबाबतचा अहवाल रुग्णालयाचे अधिष्ठातांना सादर करावा लागणार आहे.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना केंद्रीय मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. लोकेशकुमार चिरवटकर म्हणाले, “सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतोय. यामुळे डॉक्टरांना स्वतःसाठी पुरेसा वेळ काढता येत नाही. अपुऱ्या झोपेमुळे दुर्लक्ष झाल्यास डॉक्टरांना दोष दिला जातो. यासाठी निवासी डॉक्टरांच्या कामाचे स्वरूप निश्चित कऱण्यासाठी आम्ही वारंवार राज्य सरकारकडे मागणी करत होतो. त्यानुसार आता सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेत डॉक्टरांच्या कामाचे स्वरूप ठरवण्यासाठी समिती स्थापन कऱण्यास सांगितलंय.”

“प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील निवासी डॉक्टरांनी नेमकं काय काम करावं याबाबत राज्य सरकारची नियमावली नव्हती. यासाठी डॉक्टर किती तास काम करतोय हे पाहिलं जात नव्हतं. पण आता निवासी डॉक्टरांच्या कामाचं स्वरूप आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डिएमईआर) रुग्णालयातील प्रत्येक विभागाची समिती स्थापन करण्याचे आदेश दिल्याने नक्कीच याचा फायदा होईल.” असंही डॉ. लोकेशकुमार यांनी सांगितलं.

डॉ. लोकेश कुमार यांच्या सांगण्यानुसार, “सरकारी रुग्णालयानंतर आता पालिका रुग्णालयातही अशीच समिती स्थापन करण्याचं आश्वासन डॉ. सुपे यांनी दिलंय’’

निवासी डॉक्टरांच्या कामाच्या वेळेबाबत नियमावली तयार करावी, यासाठी सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या 14 डॉक्टरांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत डॉक्टरांवर पडणारा कामाचा अतिरिक्त ताण व सुरक्षिततेच्या मुद्द्यावर मागण्या मांडल्या होत्या. या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालायनं सरकारला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानुसार आता राज्य सरकारनं निवासी डॉक्टरांच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देत कामाचं स्वरूप ठरवण्यासाठी रुग्णालयातील प्रत्येक विभागाची कमिटी स्थापन करण्याची सूचना दिलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter