जे.जे. रुग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रियेमुळे ‘त्याचा’ आवाज परत मिळाला

यवतमाळच्या २७ वर्षांच्या रुग्णावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागात अतिशय दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. ज्यामुळे तो आता नीट बोलू लागला आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

यवतमाळच्या २७ वर्षांच्या रुग्णाला नीट बोलता येत नव्हतं, त्याच्या गळ्यात एक यंत्र बसवण्यात आलं होतं, ज्यामुळे बोलताना त्याला या यंत्रावर हात ठेवून हवेचा वापर करत एका विशिष्ट पद्धतीनं बोलावं लागत होतं. आपली श्वसनयंत्र आणि स्वरयंत्राची समस्या घेऊन हा रुग्ण मुंबईतील जे. जे. रुग्णालयात आला.

जे. जे. रुग्णालयात या रुग्णाचा वैद्यकीय इतिहास पाहण्यात आला. त्यावेळी त्याला २ वर्षांपूर्वी विषबाधा झाली होती आणि त्यासाठी त्याला यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याला श्वास घेता येत नव्हतं, त्यामुळे श्वसननलिकेत ट्रकियोस्टोमी (गळ्यावर छेद करून ट्युब आत टाकणे) करून यंत्र बसवण्यात आलं.

त्याच्या श्वसनाची समस्या दूर करण्यासाठी त्याच्या गळ्यात यंत्र बसवण्यात आलं खरं मात्र त्यामुळे त्याला आता नीट बोलता येत नव्हतं,  बोलताना अडथळा येत होता. बोलण्यासाठी त्याला यंत्रावर हात ठेवून हवेचा वापर करत एका विशिष्ट पद्धतीनं बोलावं लागत होतं.

जे. जे. रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी त्याला लॅरिंगोट्रकीएल रिकन्स्ट्रक्शन  (Laryngotracheal reconstruction) शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. सरकारी रुग्णालयात अशाप्रकारची सर्जरी क्वचितच केली जाते आणि खासगी रुग्णालयात या सर्जरीसाठी लाखो रुपये खर्च येतो.

डॉ श्रीनिवास चव्हाण
डॉ श्रीनिवास चव्हाण

याबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना जे. जे. रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण म्हणाले, “लॅरिंगोट्रकीएल रिकन्स्ट्रक्शन  ही शस्त्रक्रिया राज्यातील काही मोजक्याच हॉस्पिटल्समध्ये केली जाते. जे. जे. रुग्णालयात आपण दुसऱ्यांदा अशी शस्त्रक्रिया केली आहे. एखादा अपघात किंवा विषबाधेमुळे एखाद्या रुग्णाच्या श्वसनमार्गाला किरकोळ दुखापत झाली असल्यास तसंच बराच काळ कोमामध्ये राहिलेल्या रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया फायदेशीर आहे”

स्वित्झर्लंडचे डॉक्टर फिलिप मुनियार यांच्यासह डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. सर्जरीनंतर २४ तासांतच या व्यक्तीला त्याचा आवाज मिळाला आहे.

डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी सांगितलं, “आम्ही  रुग्णाच्या श्वासनलिकेचा हानी पोहोचलेला भाग काढून टाकला आणि उरलेला भाग रिकन्स्ट्रक्ट केला. शस्त्रक्रियेनंतर या रुग्णाला त्याचा आवाज पुन्हा मिळाला आहे आणि आता तो सामान्य आयुष्य जगू शकतो”

जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी शस्त्रक्रियेसाठी डॉ. फिलिप मुनियार, डॉ. श्रीनिवास चव्हाण, कान-नाक-घसा विभाग, भूलतज्ज्ञ टीम आणि नर्सिंग स्टाफचे कौतुक आणि अभिनंदन केलं आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter