मुंबईतील गोवंडीमध्ये ५० टक्के बालकं कुपोषित

राज्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर असताना, मुंबईतही कुपोषित बालकं आढळून आल्याचा दावा 'अपनालय' या सामाजिक संस्थेने केलाय. अपनालय या आरोग्यासंदर्भात काम करणाऱ्या एका संस्थेने मुंबईतील गोवंडी डम्पिंग गाऊंड जवळ राहणाऱ्या साडे तीन हजार लहान मुलांचा सर्व्हे केला असता. या सर्वेक्षणातून ५० टक्के मुलं ही कुपोषित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

कुपोषण म्हंटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतात पालघर, नाशिक आणि मेळघाटातील आदिवासी दुर्गम भाग. ज्या ठिकाणी आरोग्याच्या सोयी-सुविधा नाहीत. मुलांना चांगलं पौष्टिक अन्न मिळत नाही. पण देशाच्या आर्थिक राजधानीतही कुपोषित मुलं आहेत, असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, ‘अपनालय’ या सामाजिक संस्थेने मुंबईतही कुपोषणाची समस्या मोठी असल्याचा दावा केलाय.

‘अपनालय’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून मुंबईच्या गोवंडी परिसरातील ५० टक्के बालके कुपोषित आहेत तर ३५ टक्के बालकांचे वजन खूप कमी असल्याचे समोर आलं आहे.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना ‘अपनालय’ संस्थेचे प्रकल्प संचालक निनाद साळूंखे म्हणाले की, “दर महिन्याला आरोग्य वर्कर एम-वॉर्ड भागात जाऊन तेथील मुलांच्या प्रकृतीची तपासणी करतात. गेल्या महिन्यात कुपोषणासंदर्भात हे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणात ० ते  ६ वयोगटातील साडेतीन हजार मुलांचा समावेश करण्यात आला होता. या आरोग्य तपासणीत ५० टक्के मुले कुपोषित असल्याचे आढळून आलं.”

निनाद यांच्या माहितीनुसार, कुपोषित बालकांबाबत मुंबई महानगरपालिकेला माहिती देण्यात आली आहे.

सर्व्हेक्षणात काय आढळलं

१८ टक्के मुले वेस्टिंग (उंचीच्या तुलनेत बालकांचे वजन कमी)

५३ टक्के मुलांमध्ये स्टन्टिंग (वयाच्या तुलनेत उंची कमी)ची समस्या होती.

४४ टक्के लहान मुलांचे वजन प्रमाणापेक्षा खूपच कमी होते.

गोवंडीत दर चार बालकांमागे दोन बालकं कुपोषित आहेत

गोवंडीतील रफीनगर, साईनगर, निरंकारी नगर, बुद्धनगर, शांतीनगर, इंदिरानगर व आदर्शनगर या झोपडपट्टीच्या आणि डम्पिंग डाऊंडच्या शेजारी राहणाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

निनाद साळुंखे पुढे म्हणाले की, “कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे याकरता संस्थेच्या माध्यमातून या परिसरात दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. इतकंच नाहीतर या मुलांना पौष्टिक आहारही पुरवला जातो. मात्र तरीही कुपोषण बालकं आढळून आल्यास पहिल्यांदा त्याच्या आई-वडिलांना याची माहिती देऊन त्याचे समुपदेशन केले जाते. कारण अनेकदा आपलं मुलं कुपोषित आहे यावर पालकांचा विश्वासच बसत नाही. अशावेळी त्यांना विश्वासात घेऊन नीट सांगावे लागते.”

मुंबईत एकीकडे दिव्यांची रोषणाई पाहायला मिळतं तर, दुसरीकडे मुंबईच्या मध्यभागी कुपोषणाचं वास्तव पाहायला मिळलं. यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter