औषधांवरील जीएसटी ५ टक्क्यांवर आणा, राज्याची केंद्राकडे मागणी

मधुमेह, हृदयरोग आणि कॅन्सरच्या औषधांवरील जीएसटी कमी करावा अशी मागणी महाराष्ट्र सरकार जीएसटी काऊंसिलकडे करणार आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • मधुमेह, हृदयरोग आणि कॅन्सरसारख्या औषधांवर आकारला जातो १२ टक्के जीएसटी
  • जीएसटी ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची महाराष्ट्र सरकार करणार केंद्राला विनंती
  • राज्यातील जनतेला परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी राज्य सरकार करणार जीएसटी काऊंसिलशी चर्चा

महाराष्ट्रात मधुमेह, हृदयरोग आणि कॅन्सरसारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढतेय. सामान्यांना मधुमेह, हृदयरोग आणि कॅन्सरवरील उपचारांसाठी असणारी महागडी औषध परवडत नाहीत. औषधांच्या किमती सामान्यांना परवडणाऱ्या असाव्यात यासाठी राज्य सरकार जीएसटी काउंसिलला औषधांवरील जीएसटी कमी करण्याची विनंती करणार आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिलीये.

विधीमंडळात माहिती देताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मधुमेह , हृदयरोग आणि कर्करोगाच्या औषधांवरील जीएसटी कर १२ टक्क्यांवरून वरून ५ टक्क्यांवर आण्यासाठी सरकार जीएसटी काउंसिलला विनंती करणार आहे. या आधी सुद्धा औषधांवरील जीएसटी कर कमी करण्याची विनंती सरकारने केली होती.”

सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, “गरिबांना उत्तम दर्जाच्या औषधांचा पुरवठा केला जाईल. कमी किमतीचे कमी दर्जाचे व जास्त किमतीचे उत्तम दर्जाचं औषध असा भेद कोणी केला तर सरकार त्यांच्यावर कडक कारवाई करेल.”

राज्य सरकारने उचललेल्या या पावलाबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना पुण्याच्या जनआरोग्य अभियान समितीचे समन्वयक डॉ. अभिजीत मोरे म्हणाले, “औषधांवरील जीएसटी कमी करण्यासाठी केंद्राला विनंती करण्याचं सरकारने उचललेलं पाऊल योग्य आहे. पण, याला पहिलंच पाऊल म्हणावं लागेल. मधुमेहाची औषध सरकारने मोफत उपलब्ध करून दिली पाहिजेत. कारण मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढतेय. आणि सामान्यांना ही औषध परवडण्यासारखी नाहीत.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter