मोफत वैद्यकीय सुविधांसाठी भारतातील पहिलं फिरतं पोटविकार केंद्र- मुख्यमंत्री

भारतातील पहिलं ‘एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स’ म्हणजे फिरतं पोटविकार केंद्रांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. ग्रामीण भागातील गरीब, गरजूंना अद्ययावत दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळावेत हा या मागचा प्रमुख उद्देश आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

भारतातील पहिलं ‘एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स’ म्हणजे फिरतं पोटविकार केंद्रांचं अनावरण करण्यात आलं. पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांच्या संकल्पनेतून हे केंद्र साकारण्यात आलं आहे. ग्रामीण भागातील गरीब, गरजूंना अद्ययावत दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळावेत हा या मागचा प्रमुख उद्देश आहे.

मंगळवारी विधानमंडळाच्या प्रांगणात महाराष्ट्र शासन आणि बलदोटा इन्स्ट‍िट्यूट ऑफ डायजेस्टीव्ह सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणाऱ्या ‘एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स’ म्हणजेच फिरत्या पोटविकार केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

WhatsApp Image 2019-12-10 at 11.03.46 PM

ग्रामीण भागातील जनतेला पोटविकाराचे अत्याधुनिक उपचार मिळावेत, त्यासोबत या विकारांचं निदान तात्काळ या फिरत्या पोटविकार केंद्राद्वारे होणार आहे. दुर्गम, आदिवासी भागातील लोकांना शहरातील महागड्या रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागतात. गरीबांना महागडे उपचार परवडण्यासारखे नसतात. त्यामुळे लोकांना उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सोयी-सुविधा मिळवून देण्याच्या ‘दृष्टीने एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स’ची सुरूवात झाली.

WhatsApp Image 2019-12-10 at 11.03.45 PM

यासंदर्भात बोलताना ग्लोबल रूग्णालयाचे संचालक डॉ. अमित मायदेव म्हणाले, “रुग्णांना त्यांच्या घराजवळ उपचार मिळावेत, यासाठी तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांकडे जाणार आहेत. हे केंद्र महाराष्ट्रभर फिरून लोकांची तपासणी आणि उपचार करणार आहे. या केंद्रातील संपूर्ण सुविधा विनामुल्य असणार आहे. एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स, ही गाडी वर्षभर महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागात फिरणार आहे. या गाडीत अद्ययावत सोयी-सुविधांनी सज्ज ऑपरेशन थिएटर देखील आहे.”

या गाडीत उपस्थित असणारे 2 तज्ज्ञ डॉक्टर आणि टेक्निशिअन रुग्णांना वैद्यकीय सुविधा देतील. एच-पायलोरी, कॅन्सरचं लवकर निदान, आतड्यांचे अल्सर, बायोप्सी, आतड्यांना सूज आली असेल तर त्याचं निदान, ऍसिडिटीची तपासणी या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येईल. या केंद्रासाठी नरेंद्र कुमार बलदोटा व परिवार यांनी देणगी देऊन पुढाकार घेतला आहे.

WhatsApp Image 2019-12-10 at 11.03.43 PM

पोटविकार म्हणजे काय? ते कशामुळे होतात? याची माहिती सामान्यांना नसते. त्यामुळे पोटविकार होण्याची कारणं, त्यावर उपाय, उपचार यांबाबत लोकांमध्ये या केंद्राच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. एखाद्या प्रकरणात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हवा असल्यास डॉ. अमित मायदेव स्वत: गाडीवर उपलब्ध असणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करतील.

राज्यातील अतिदुर्गम, आदिवासी भागातील लोकांना, तसंच प्रमुख शहरातील झोपडपट्टीत आणि ज्या शहरी भागात अद्ययावत वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत अशा भागातही ही गाडी फिरणार आहे. या गाडीचे प्रभारी म्हणून ग्लोबल रुग्णालयाचे संचालक डॉ. अमित मायदेव सर्व कामकाज पाहतील.

या दरम्यान विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, आमदार आदित्य ठाकरे, माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसुळ, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, बीआयडीएस केंद्राचे संचालक पद्मश्री डॉ.अमित मायदेव आदीसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

WhatsApp Image 2019-12-10 at 11.03.42 PM

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter