महानिवडणूक-एक रूपयात आरोग्य चाचणी शिवसेनेचं ‘वचन’

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. रॅली, प्रचारसभा, प्रभातफेरी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहिरनामा सत्र सुरू झालंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी शनिवारी शिवसेनेचा वचननामा प्रकाशित केला. एका रूपयात आरोग्य तपासणीचं वचन शिवसेनेने मतदारांना दिलं आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

रुग्णालयात किंवा साध्या रक्त तपासणीसाठीदेखील 100 ते 200 रूपये मोजावेच लागतात. पण, लवकरच जनतेला फक्त एक रुपयात आरोग्य चाचणी सेवा उपलब्ध होणार आहे. होय, फक्त एका रुपयात तब्बल 200 तपासण्या करून मिळणार आहेत. राज्यातील मतदारांना हे वचन खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.

शिवसेनेने शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठीचा वचननामा मुंबईत प्रसिद्ध केला. राज्याच्या जनतेचं आरोग्य लक्षात घेता, शिवसेनेने या वचननाम्यात आरोग्यविषयक गोष्टींवर भर दिला आहे.

शिवसेनेचा वचननामा

  • 1 रुपयात 200 आरोग्य चाचण्या करण्यात येणार आहेत आणि हे करताना आर्थिक समतोल ढळणार नाही याची काळजी घेतली आहे.
  • सर्व जिल्ह्यांमध्ये एक वैद्यकीय महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार
  • प्रत्येक जिल्हा रुग्णालयांमध्ये स्त्रियांच्या कर्करोग चाचणीसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणार
  • दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी ‘रियल टाईम टेलीमेडिसीन’ या प्रणालीचा वापर राज्यभर करणार
  • सरकारी व खासगी सहयोगाच्या मार्फत दुर्गम भागात सर्व औषधे व उपचार प्रक्रियेसह परिपूर्ण फिरते रुग्णालय ‘मिनी मोबाईल आरोग्य केंद्र’
  • सागरी किनारपट्टीचा विस्तार लक्षात घेवून ‘बोट अॅम्ब्युलन्स’ सेवा उपलब्ध करणार
  • ‘वन रूपी क्लिनिक’: शिव आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य चाचणी सुविधा देण्यासाठी नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा पातळीवर ‘वन रूपी क्लिनिक’ सुरू करणार
  • हजार रुग्णांसाठी एक डॉक्टर या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आणि औषधांसहित परिपूर्ण करणार

वचननामा प्रसिद्ध करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्याच्या तिजोरीचा विचार करून हा वचननामा बनवण्यात आला आहे. गेल्या 5 वर्षांचा फिरण्याचा अनुभव, लोकांशी चर्चा, लोकांचे प्रश्न आणि मागण्या एकत्र करून हा वचननामा बनवण्यात आला आहे. या वचननाम्यात दिलेला प्रत्येक शब्द शिवसेना पूर्ण करेल.”

 

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here